Breaking News

सचिन वाझे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती

केंद्र सरकारने चौकशी करावी -राज ठाकरे

मुंबई ः प्रतिनिधी
दहशतवादी बॉम्ब ठेवतात अशा घटना आपण आजवर पाहत आलो, पण आता पोलीस बॉम्ब ठेवतात ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीने होणार नाही. केंद्र सरकारने या प्रकरणाची कसून चौकशी करायला हवी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत राज ठाकरे यांनी रविवारी (दि. 21) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या वेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे गंभीर आहेच, पण मूळ प्रश्न अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला कुणी? कुणाच्या आदेशाशिवाय एखाद्या पोलिसाकडून बॉम्ब ठेवण्याचे धाडस होणार नाही. त्यामुळे यामागचे खरे हात वेगळेच आहेत. सचिन वाझेची आता धिंड काढली जातेय, पण त्याला शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी घेऊन कोण गेले होते? फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याची वारंवार मागणी केली होती, असे फडणवीस यांनी स्वत: सांगितले आहे. म्हणजे सचिन वाझे हा व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचा आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही. याची कसून चौकशी राज्याकडून नव्हे, तर केंद्राकडून व्हायला हवी. मग कशी राज्यात फटाक्यांची माळ लागते ते पाहा. कुणाकुणाची नावे बाहेर येतील याची कल्पनादेखील आपण करू शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणात जर सचिन वाझेचा हात होता. मग मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली का केली गेली? आणि जर सिंहही यात सामील असतील मग त्यांची चौकशी न करता त्यांची बदली का केली गेली या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे. कारण सिंह यांच्या बदलीचे नेमके कारणच सरकारने दिलेले नाही.
-राज ठाकरे

इतका पैसा गेला कुठे?
राज्याचा गृहमंत्री मुंबईसारख्या शहराच्या पोलीस आयुक्तांना वसुलीचे टार्गेट देतो हा अतिशय घाणेरडा प्रकार असून मुंबईसाठी जर देशमुखांनी 100 कोटींचे टार्गेट दिले होते तर इतर शहरांमध्ये काय परिस्थिती असेल, असा सवाल राज ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला. यासोबत परमबीर सिंह मुंबईचे पोलीस आयुक्त होऊन वर्षभराचा कालावधी झाला आहे. जर महिन्याला 100 कोटी पकडले तर वर्षाचे 1200 कोटी रुपये जमा झाल्याचे आपण समजायचे का? इतका पैसा गेला कुठे? असेही सवाल राज यांनी उपस्थित केले आहेत.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply