Breaking News

सिडकोच्या भोंगळ कारभारामुळे नामदेववाडीतील रहिवासी दहशतीखाली; 14 घरांना पाण्याचा वेढा

पनवेल ः वार्ताहर

मुसळधार पावसामुळे पनवेलजवळील वडघर येथील नामदेववाडी येथे राहणार्‍या 14 घरांना पाण्याने वेढले आहे. धुवाँधार पावसामुळे येथील सर्व कुटुंबे भीतीच्या सावटाखाली येथे राहत असून सिडकोने केलेल्या भरावामुळेच आज आमची ही अवस्था झाल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अनेक गावे विस्थापित करण्यात आली. त्यातील काही गावांना वडघर, करंजाडे, पुष्पकनगर परिसरात वसविण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आहे. या भरावामुळे काही घरे खाली गेली आहेत. त्याचा फटका आताच्या पावसाळ्यात नामदेववाडी येथील रहिवाशांना बसला असून चारही बाजूंनी पाणी आल्याने घराबाहेर कसे पडायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सिडकोने गेल्या सहा वर्षांपासून तुमचे पुनर्वसन कऱण्यात येईल, असे आश्वासन तेथील नागरिकांना दिले आहे, परंतु अद्याप सिडकोच्या भोंगळ कारभारामुळे याबाबतची फाइलच पुढे सरकत नसल्याने येथील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

सिडकोने केलेल्या भरावामुळे येथील पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात परिसर जलमय होऊन घरांमध्ये पाणी शिरले आहे. या समस्येकडे सिडकोने वेळीच लक्ष न दिल्यास येणार्‍या पावसात मोठी दुर्घटना घडू शकते. याला संपूर्ण जबाबदार सिडको व तेथील अधिकारी असणार आहेत.

-महेश साळुंखे, स्थानिक रहिवासी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply