Breaking News

सणांवरच निर्बंध का? -राज; दहीहंडीवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीला राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतरही मुंबई, ठाण्यात काही ठिकाणी मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर याच्या समर्थनार्थ भूमिका घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. कुठेच काही गोष्टी कमी झाल्या नाहीत. मग सणांवरच का येता, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोलकेला. राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी मंगळवारी (दि. 31) पत्रकार परिषद घेतली. या वेळी दहीहंडी उत्सव साजरा करून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसैनिकांवर गुन्हे नोंद होत आहेत, त्याबद्दल राज यांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, अस्वलाच्या अंगावर केस किती हे अस्वल मोजत नाही, तसे आमच्या अंगावर केसेस किती आहेत. सगळे सूडबुद्धीने सुरू आहे. हे विरोधी पक्षात असते तर काय केले असते? गेल्या वेळच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती झाली आहे. दुसरीकडे भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत. बाकीच्यांनी मंदिरात जायचे नाही. यांनी वाटेल त्या गोष्टी करायच्या. आम्ही दहीहांडी साजरी करायची नाही. माननीय बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या येणे काही कमी झालेल्या दिसत नाहीत. सरकारकडून कामे करून घेण्यासाठी येणार्‍यांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नाहीत. कुठेच काही कमी झालेले नाही तर या सणांवरच तुम्ही कसे काय येता? त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना जोरात दहीहंडी उत्सव साजरा करा जे होईल ते होईल असे सांगितले होते, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply