दोन साथीदारांसह कोठडीत रवानगी
खोपोली ः प्रतिनिधी
गोळीबार करून फरार झालेला खोपोली नगर परिषदेचा शेकापचा नगरसेवक प्रशांत कोठावले व त्याचे दोन साथीदार यांना अटक करण्यात अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याला यश आले आहे. या तिघांना खालापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 मार्चला एका नगरसेवकाच्या पुतण्याच्या हळदी समारंभात क्षुल्लक कारणावरून प्रशांत कोठावले व अन्य एक जणामध्ये शाब्दिक वाद झाला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तुकाराम साबळे यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला. त्यानंतर सगळे आपापल्या घरी निघून गेले, मात्र त्याच मध्यरात्री कोठावले व अन्य दोन साथीदार साबळे यांच्या घरासमोर येऊन अपशब्द बोलू लागले. ही खबर शांतीनगर व परिसरात पसरताच मोठी गर्दी होऊ लागली. या वेळी कोठावले यांनी हवेत पिस्तुलाचा बार करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
याचदरम्यान गस्तीवर असलेले पोलीस तेथे आले असता, कोठावले व दोन साथीदार आपल्या कारमध्ये बसून पसार झाले. पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दोन वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला होता. अशातच अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याने कोठावले व त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. त्यांना खालापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, दरम्यान, काही दिवसांपूर्वी महिंद्रा सानयो या कारखान्यामधील एका अधिकार्याला रस्त्यात अडवून दोन ते तीन जणांनी मारहाण केली होती. या प्रकरणातही कोठावले यांचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून, या संदर्भात पोलीस चौकशी करीत आहे.