Breaking News

हे तर चोरांचे आणि खुन्यांचे सरकार -प्रकाश आंबेडकर

मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. हे चोरांचे आणि खुन्यांचे सरकार आहे. त्यामुळे ते बरखास्त करण्याची मागणी आम्ही राज्यपालांना करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारण आणि प्रशासनातले गुन्हेगारी घटक एकत्र येऊन काय काय करू शकतात हे आपण पाहातो आहोत. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी 100 कोटी कसे वसूल करायला सांगितले हे स्पष्ट केले आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी आहे, पण नेक्सस उभे राहिलेले आहे. हे चोरांचे आणि खुन्यांचे सरकार आहे. त्यामुळे सोमवारी राज्यपालांना भेटून सरकार बरखास्त करा, अशी मागणी आम्ही करणार आहोत.
संजय राऊतांकडून घरचा अहेर
मुंबई ः या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील सर्व घटकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत घरचा अहेर दिला. राऊत म्हणाले, सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोंडे उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावे लागेल.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply