Breaking News

पनवेलमध्ये लसीकरण केंद्रे निश्चित करावीत

भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे यांचे निवेदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

देशभरात सध्या कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 1 मेपासून सुरू होणार्‍या 18 वर्षांवरील नागरिकांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लसीकरण केंद्र निश्चित करण्याबाबत भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले आहे.

जयंत पगडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने 1 मेपासून भारतातील सर्व राज्यांमध्ये 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या वयोगटातील लसीकरणासाठी नागरिकांची मोठी संख्या आहे. अगोदरच 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे 1 मेपासून लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होऊ शकते. याअगोदर पनवेल महानगरपालिकेमार्फत पनवेल शहरात सात लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी प्रत्येकी 100 नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पनवेल शहराची लोकसंख्या विचारात घेता या लसीकरण केंद्रांची संख्या कमी आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने 1 मेपासून सुरू होणार्‍या लसीकरणासाठी प्रशासनास नवीन लसीकरण केंद्रे निर्माण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रभाग क्रमांक 20मधील तक्का गाव, तक्का कॉलनी परिसर व काळुंद्रे, भिंगारी येथील नागरिकांना लसीकरणासाठी पनवेल शहरात जावे लागते. त्यामुळे शारीरिक, मानसिक त्रासासह आर्थिक भार सोसावा लागतो. लसीकरण केंद्रावर गर्दी असल्यास नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. प्रभाग क्रमांक 20मध्ये 18 वर्षांवरील लसीकरणासाठी पात्र नागरिकांची संख्या 15000च्या आसपास आहे.

त्यामुळे तक्का मराठी शाळा, काळुंद्रे गाव मराठी शाळा किंवा ओएनजीसी हॉस्पिटल, पोदी मराठी शाळा किंवा सीकेटी हायस्कूल नवीन पनवेल या ठिकाणी नवीन लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात यावीत. ह्या तिन्ही ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची प्रशस्त व्यवस्था असून रहदारीसाठी आणि लसीकरणासाठी येणार्‍या नागरिकांना ये-जा करण्यासाठी सोयीचे ठरेल. तेथील लसीकरण केंद्रावर नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा, पिण्याचे पाणी, तज्ज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस आदी सुविधा पुरविण्यात याव्यात, असेही शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply