Breaking News

खालापुरात गोवंश हत्येविरोधात मोर्चा

आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रशासनाला इशारा

खोपोली : प्रतिनिधी
गोमाता आमची माता आहे आणि गोवंश हत्या प्रकरणे या भागात वारंवार घडत असतील तर याचा आम्हाला विचार करावा लागेल. याबाबत कायदा असतानाही अशा घटना घडतात हा प्रशासनाचा कमकुवतपणा आहे. गोवंश हत्या हा हिंदू धर्माच्या अस्मितेचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे यापुढे असा प्रकार घडू नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी तसेच आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 15) केली. ते खालापूर येथे निषेध मोर्चाला संबोधित करीत होते.
खालापूर तालुक्यातील अष्टविनायकापैकी एक क्षेत्र असलेल्या महड येथे गोवंश हत्या प्रकरण झाले होते. या घटनेने खळबळ उडाली होती. सर्व हिंदू संघटना, वारकरी संप्रदाय व जैन संघटनांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी खालापूर तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
खालापूर फाटा येथून निघालेल्या या निषेध मोर्चात भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, दीपक बेहेरे, उपाध्यक्ष वसंत भोईर, निवृत्ती पिंगळे, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, शशिकांत मोरे, किरण ठाकरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री रमेश मोगरे, साईनाथ श्रीखंडे, रूपेश मिस्त्री, रवींद्र जैन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अविनाश मोरे, राकेशकुमार पाठक, वारकरी संप्रदायाचे प्रवीण महाराज फराट, दिलीप महाराज राणे, भाजप खोपोली अध्यक्ष रमेश रेटरेकर, महिला मोर्चा अध्यक्ष शोभा काटे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, स्नेहल सावंत, भाजप सरचिटणीस हेमंत नांदे, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर, सोशल मीडिया सेलचे राहुल जाधव, राष्ट्रसेविका समिती जिल्हा सहकार्यवाह माधवी कुवळेकर यांच्यासह विविध संघटनांचे व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, हजारो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
खालापूर तहसील कार्यालयाजवळच्या प्रवेशद्वारावर निषेध मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी तो अडवला. या वेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या सभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचार मांडताना आरोपींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
माजी नगरसेवक राजेंद्र फक्के, शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, विश्व हिंदू परिषदेचे रमेश मोगरे, वारकरी संप्रदायाचे हभप प्रवीण महाराज फराट यांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या. अनेक वक्त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला.
यानंतर तहसील कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार आयुब तांबोळी यांना निवेदन दिले. तत्पूर्वी तहसीलदार तांबोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, निरीक्षक बाळा कुंभार यांच्याबरोबर या घटनेबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी आमदार ठाकूर यांनी आतापर्यंत आरोपींबाबत केलेल्या कायदेशीर कारवाईबाबत विचारणा करताना पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याबद्दल खडे बोल सुनावले. या प्रकरणाबाबत पोलीस संथगतीने तपास करीत आहेत व आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित आरोपींच्या मागील गुन्ह्याबाबत नवीन आरोपपत्र दाखल करताना तोही उल्लेख असावा, अशी चर्चेदरम्यान मागणी करण्यात आली.
चर्चेदरम्यान भाजपचे विनोद साबळे, मनसेचे जितेंद्र पाटील, शिवसेनेचे डॉ. सुनील पाटील, युवा मोर्चाचे प्रसाद पाटील, विहिंपचे रमेश मोगरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अविनाश मोरे व इतरांनी सहभाग घेताना या प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच मोक्कासारखा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply