Tuesday , March 28 2023
Breaking News

शिक्कामोर्तब!

भाजप-शिवसेना युतीची मुंबईत घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा सोमवारी (दि. 18) झाली. युतीच्या घोषणेबरोबरच दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार लोकसभा निवडणुकीत भाजप 25 आणि शिवसेना 23 जागांवर लढणार आहे; तर विधानसभेमध्ये जागावाटपाचा 50-50चा फॉर्म्युला दोन्ही पक्षांनी मान्य केला असून, मित्रपक्षांना ठरावीक जागा देऊन उर्वरित जागांचे दोन्ही पक्षांमध्ये निम्म्या निम्म्याने वाटप होणार आहे.

मुंबईत झालेल्या या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे; तर शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यासह युतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची मागील 25 वर्षे युती आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात आणि देशात एकत्रच वावरले आहेत. काही मुद्द्यांवर आपसात मतभेद झाले होते, मात्र दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. आमचा मूळ विचार सारखाच आहे. म्हणूनच इतकी वर्षे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एकत्र राहिलो. मागच्या विधानसभेच्या वेळी काही कारणांमुळे आम्ही एकत्र राहू शकलो नाही, परंतु राज्यात युतीचे आणि केंद्रात एनडीएचे सरकार आम्ही एकत्रितपणे चालवत आहोत. सध्या काही पक्ष एकत्र येऊन आम्हाला विरोध करीत आहेत. अशात आम्ही एकत्र यावे ही जनभावना होती. तो कौल आम्ही मान्य केला आहे. लोकसभा आणि विधानसभेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

शिवसेना-भाजप एकदिलाने एकत्र आल्यास देश मजबूत बनेल या भावनेतून युती केल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले; तर अमित शहा यांनी युती झाल्याने शिवसेना व भाजपच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांची इच्छापूर्ती झाल्याचे सांगून आनंद व्यक्त केला.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply