नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या टीम मॅनेजमेंटने डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरुन काढल्याची घोषणा केली. त्याच्या जागेवर केन विल्यमसनकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली. हे कमी होते म्हणून की काय त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही जागा मिळाली नाही. एवढा पाणउतारा झाल्यानंतरही वॉर्नर डग आउटमध्ये हसतमुखाने बसल्याचे पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादच्या संघात स्वत:चे एक वेगळे वलय निर्माण करणार्या वॉर्नरवर बाकावर बसण्याची वेळ आली. तरीही त्याची संघाबाबतची आत्मियता अजिबात कमी झालेली नाही, हेच राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाले. क्रिकेटच्या मैदानात बारावा खेळाडू हा मैदानातील आपल्या सहकार्यांना पाणी आणून देणे, बॅट चेंजसाठी मैदानात येण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ही जबाबदारी वॉर्नरने स्वत:हून पुढे येऊन निभावल्याचे पाहायला मिळाले. या संदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये तो आपल्या संघातील युवा खेळाडूच्या हातून हेल्मेट हिसकावून घेत मीच खेळाडूला जाऊन ते देतो? असेच काहीसे कृत्य त्याने केल्याचे पाहायला मिळते. त्याची ही वृत्ती खूप काही सांगून जाणारी आहे. 2015 पासून डेविड वॉर्नर सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसते. 67 सामन्यांत त्याने हैदराबाद संघाचे नेतृत्व केले असून, 35 विजय आणि 30 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दोन सामने टाय झाले आहेत. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने 27 सामन्यांत 14 विजय आणि 11 पराभव झाले असून, विल्यमसनच्या नेतृवाखालील विनिंग पर्सेंटेज हे 56.76 इतके आहे. वॉर्नरच्या तुलनेत हे अधिक आहे.