नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशात सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे या स्पर्धेचा 14वा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी (दि. 4) घेतला. बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.
कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आल्यानंतर त्यांचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जच्याही तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. वाढत्या कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलने स्पर्धा स्थगित करीत असल्याचे जाहीर केले आहे.
बायो-बबलमध्येही कोरोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच बीसीसीआय सर्व सामने मुंबईत खेळण्याची तयारी करीत होते, मात्र यादरम्यान हैदराबादच्या वृद्धिमान साहा याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. हैदराबाद आणि मुंबईमध्ये मंगळवारी दिल्लीत सामना होणार होता. खेळाडूंनाही कोरोनची लागण होत असल्याने अखेर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
चेन्नईच्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी बुधवारी राजस्थानविरोधात होणारा सामना आपण खेळू शकणार नसल्याचे बीसीसीआयला कळवले होते. जोपर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांच्या संपर्कात आलेले सर्व खेळाडू तिन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत मैदानात उतरण्यास इच्छुक नसल्याचे चेन्नई संघाने बीसीसीआयला कळवले होते. नियमाप्रमाणे यासाठी सहा दिवसांचा कालावधी लागणार होता.
आयपीएलचे आतापर्यंत 29 सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे, तर चेन्नई दुसर्या, बंगळुरु तिसर्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.
बीसीसीआयने आयपीएल रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना स्थिती लक्षात घेता स्पर्धा पुन्हा कधी खेळवायची या संबंधी निर्णय घेतला जाईल.
-राजीव शुक्ला, बीसीसीआयचे उपाध्यक्ष