पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पनवेल येथील प्राथमिक फेरीला गुरुवार (दि. 19)पासून प्रारंभ होत आहे.
या स्पर्धेची पुणे येथील प्राथमिक फेरी पूर्ण झाली असून, पनवेल येथील प्राथमिक फेरी 22 डिसेंबरपर्यंत खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे, तर अंतिम फेरी 3 व 4 जानेवारी 2020 रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
नाट्य चळवळ वद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्यविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिलेले माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला.
नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होत आले आहेत. देखणे व नेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. वाढता प्रतिसाद आणि कलाकार व रसिकांच्या मागणीमुळे ही स्पर्धा कोकण व मुंबईपुरती मर्यादित न ठेवता राज्यस्तरीय करण्यात आली, तसेच बक्षिसांच्या रकमेतही भरघोस वाढ करण्यात आली आहे.
-अशी आहेत पारितोषिके
प्रथम क्रमांक एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांक 50 हजार रु., प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक 25 हजार रु., प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक 10 हजार रु., प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजनाकार, त्याचबरोबर प्राथमिक फेरीतील सर्व विजेत्या संघांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.