पुणे ः प्रतिनिधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे काँग्रेस नेते व खासदार राजीव सातव यांचे रविवारी (दि. 16) पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. सातव यांना 22 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. अखेर रविवारी त्यांनी वयाच्या 46व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सातव यांना कोरोनाने गाठल्यानंतर उपचारानंतर ते बरे झाले होते, मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यांना सायटोमेगालो विषाणूचा संसर्ग झाला होता. सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी हिंगोलीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सातव यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
राजीव सातव हे तरुण नेते होते. पुढे जाऊन मोठी जबाबदारी सांभाळण्याची त्यांची क्षमता होती. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय व मित्रांबद्दल संवेदना व्यक्त करतो.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान
राजीव सातव आमच्या घरातील सदस्याप्रमाणे होते. ते एक सुसंस्कृत नेतृत्व होते. मला त्यांचा चांगला अनुभव आला. त्यांच्या अकाली निधनाने ठाकूर कुटुंबाला अतिशय दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार
काँग्रेस नेते आणि माझे सहकारी राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक व दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-प्रशांत ठाकूर, आमदार