नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईची ओळख उद्यानाचे शहर अशी होत असताना या उद्यानांत गर्दुल्ले व मद्यपींचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ऐरोली सेक्टर 4 मध्ये उच्च विद्युतवाहिनी खाली छत्रपती संभाजी महाराज उद्यान पालिकेने विकसित केले आहे. उद्यानात वयोवृद्धांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी दुपारी, रात्री तरुणाची टोळकी येऊन मद्यप्राशन करत बसलेले असतात तर रात्रीच्या वेळेस गर्दुले, व गांजा पिणारे येऊन बसतात याचा त्रास माऊली संकुलातील व्यापार्यांना होत आहे. येथे दैनंदिन गरजेच्या वस्तु खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची वर्दळ सुरू असते. त्यामुळे या मद्यपी व गर्दुल्ले यांच्यापासून महिलांना धोका संभवतो. आम्ही माऊली संकुलात विविध प्रकारचे व्यवसाय करतो आणि उदरनिर्वाह करतो, मात्र पालिकेने उद्यान विकसित केल्यानंतर मद्यपी, गर्दुल्ले यांचा वावर वाढल्याने व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे, असे व्यापार्यांनी सांगितले. पालिकेने लवकरात लवकर उद्यानात सुरक्षा रक्षक तैनात करावा व मुख्य प्रवेशद्वार रात्री बंद करावे, अशी मागणी होत आहे.