Breaking News

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार..!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंजार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या धोरणानुसार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी फाजल अली कमिशनची नेमणूक केली. या कमिशनच्या अहवालानुसार महाराष्ट्र-गुजरात या मराठी व गुजराती भाषिकांची वेगवेगळी राज्ये न करता द्वैभाषिकांचे एकच राज्य करण्यात आले. हा मराठी भाषिकांवर सरळसरळ केंद्राने केलेला अन्याय होता. या अन्यायाविरुद्ध सारा महाराष्ट्र पेटून उठला होता. दि. बा. पाटील हे त्या काळात कुलाबा जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य होते. 1952 साली झालेल्या लोकल बोर्डाच्या निवडणुकीत उरण मतदारसंघातून ते निवडून आले होते. आपला वकिली व्यवसाय सांभाळत लोकप्रतिनिधी म्हणून ते उत्तम प्रकारे काम करीत होते. या निवडणुकीद्वारेच त्यांनी राजकारणात खर्‍या अर्थी प्रवेश केला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ दिवसेंदिवस वाढत होती. लोकांचा संताप अनावर झाला होता. ही लोकभावना दि.बां.ना स्वस्त बसू देत नव्हती. त्यांनी या चळवळीत भाग घेण्यासाठी लोकल बोर्डाच्या सदस्यत्वाचा 1956 साली राजीनामा दिला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. ही चळवळ उरण, पनवेल परिसरात त्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या प्रमाणात फोफावली,वाढली. मोर्चा, निदर्शने करून लोक आपला संताप व्यक्त करीत होते.दि. बा. पाटील लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना योग्य मार्गदर्शन करीत असत. त्यांच्यासोबत डॉ. वैद्य, गोखले, लिमये ही वकील मंडळी असत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. अशा परिस्थितीत 1957 साली विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक दि.बा.पाटील यांनी लढवावी अशी मागणी जोर धरू लागली.दि.बां.चे राजकीय गुरू आणि कुलाबा जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अग्रणी नेते नारायण नागू पाटील यांनीही त्यांना उभे राहाण्याची विनंती केली.भाऊसाहेब राऊतही त्याच मतांचे होते.या सर्वांच्या आग्रहामुळे दि.बां.नी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते कामाला लागले.गावागावात तयार झालेली कार्यकर्त्यांची फळी,जनतेचा विश्वास आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याची पार्श्वभूमी यामुळे दि.बा.पाटील यांनी ही निवडणूक 15,621 अशा बहुमतांनी जिंकली. या विजयामुळे दि.बां.चा आत्मविश्वास वाढला.ते अधिक जोमाने काम करू लागले. त्यावेळी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म़ोरारजी देसाई होते. मुंबईत व्यवसाय, उद्योग,कापड गिरण्या मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे आर्थिक उलाढालही मोठी होती.त्यामुळे महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचाच तो केंद्राचा डाव होता. केंद्राच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध केला जात होता.लोकांमधली चीड वाढत होती, असंतोष वेळोवेळी प्रकट होत होता पण राज्यकर्ते मात्र लोकांचा हा संताप चिरडण्याचा प्रयत्न करत होते. मुंबई राज्याच्या विधानसभेत याचे पडसाद वेळोवेळी उमटत होते.संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे लोकांनी 1957 सालच्या निवडणुकीत सर्वश्री एस.एम.जोशी, उद्धवराव पाटील,कॉ.ए.बी.वर्धन,दत्ता देशमुख, आचार्य अत्रे, रामभाऊ म्हाळगी, दि.बा.पाटील,आर.डी.भंडारे यांच्यासारख्या मातब्बर मंडळींना जनतेने निवडून दिले.त्यामुळे मुंबई विधानसभेत मराठी भाषिकांचा आवाज बुलंद झाला. दि.बा.पाटील हे मुळातच वकील असल्याने त्यांनी विधानसभेच्या नियमांचा सखोल अभ्यास केला आणि जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडले.विधानसभेत सरकारने सादर केलेल्या अनेक विधेयकावर त्यांनी आपले विचार अभ्यासपूर्ण रितीने  मांडले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत होती.मुंबयीतला गिरणी कामगार या लढ्यात सर्व सामर्थ्यानीशी उतरला होता.शिवाय शाहीर अमरशेख यांच्या सारखे शाहीर आपल्या पहाडी आवाजाने या आंदोलनाची धग अधिक प्रज्वलित करीत होते. 1957 मध्ये सीमा प्रश्नांसाठी महाराष्ट्रातील आंदोलकांनी बेळगावच्या सिमेवर जाऊन आंदोलन करण्याचे ठरविले.त्यासाठी विभागाविभागातून कोणी किती आंदोलक आणायचे व त्यांचे नेतृत्व कोणी करायचे हे ठरवले गेले. या आंदोलनासाठी पनवेलमधून दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर अलिबागहून अ‍ॅड दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक बेळगावला रवाना झाले.सोबत ठाण्यातून भिवंडीचे आ.भाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आलेले आंदोलक होते.त्यांनी बेळगावच्या सिमेवर जोरदार निदर्शने केली.पोलिसांनी त्यांना अटक केली आणि नंतर सोडून दिले पण या आंदोलकांनी पुन्हा आंदोलन केले.पुन्हा अटक झाली.तिसर्यांदा अटक करुन त्यांना स़ोडण्यात आले. शेवटी आंदोलकांनी परतीचा प्रवास सुरू केला तेव्हा वाटेत त्यांना निपाणी येथे सत्याग्रह सुरू असल्याचे दिसले. अगोदरच बेळगावच्या सिमेवर सत्याग्रह करून त्यांचा उत्साह वाढला होता.आंदोलनाची रग तशीच कायम होती.त्यामुळे दि.बा.आणि दत्ता पाटील यांनी तातडीने सोबतच्या आंदोलकांशी  चर्चा करून या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. निपाणीच्या या सत्याग्रहात त्यांनी जोरदार निदर्शने केली.शेवटी पोलिसांनी त्यांना अटक केली. त्याकाळी अशा सत्याग्रहींना साधारण तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा दिली जात असे पण या सत्याग्रहींचा उत्साह पाहता न्यायालयाने त्यांना एक वर्षाची सजा फर्मावली.दि.बा.पाटील आणि दत्ता पाटील तसेच भाई वैद्य यांनी ही शिक्षा सीमा बांधवांसाठी आनंदाने भोगली.कारण ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे,सीमा लढ्याचे बिनीचे शिलेदार होते.

– दीपक रा. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार

Check Also

विकासकामे भाजपच करू शकतो -अरुणशेठ भगत

केळवणे येथे विकासकामांचे भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त शेकापने विकासाच्या कामांना विरोध करण्याचे काम नेहमीच …

Leave a Reply