Breaking News

पुरोगामी आणि प्रगतिशील विचारांचे पाईक!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
दि. बा. पाटील यांच्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुरोगामी विचारांचा फार मोठा पगडा होता.
छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे दैवत होते. आपल्या या दैवताचा पनवेलमध्ये एखादा पुतळा उभारावा, ही त्यांची फार आंतरिक इच्छा होती.त्याप्रमाणे त्यांनी महाराजांचा एक अर्धपुतळा बनवून घेतला आणि तो पनवेल नगरपालिकेकडे दिला. नगरपालिकेने तो पूर्वीच्या टपाल नाक्यावर बसविला. या नाक्याचे पुढे शिवाजी चौक असे नामकरण करण्यात आले. या पुतळ्यासाठी दि.बां.नी त्यांना लग्नात सासूरवाडीकडून मिळालेली अंगठी देणगी म्हणून दिली. ही घटना तशी लहान वाटत असली तरी यामागची त्यांची भावना फार मोठी होती.
या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन नगरपालिकेचे अध्यक्ष बी. एस. वैद्य  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात ज्येष्ठ वकील गजाननराव श्रृंगारपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
एकीकडे विधानसभेत दि. बा. शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत होते, तर दुसरीकडे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ कसा मिळवून देता येईल, त्यासंबंधीच्या सोयी कशा उपलब्ध करता येतील याचाही विचार करीत होते. याची सुरुवात त्यांनी आपल्या जासई गावापासूनच केली. तेथे त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 1960 साली माध्यमिक शाळा उघडली आणि त्यानंतर पुढील दोन-चार वर्षांत पिरकोन, पळस्पे, नावडे, फुंडे, गव्हाण येथे माध्यमिक शाळा उघडल्या. रोहिंजण येथील माध्यमिक शाळा मात्र काही तांत्रिक कारणांमुळे रयत शिक्षण संस्थेला जोडता आली नाही. या शाळा सुरू करण्यासाठी दि. बा. पाटील यांनी बरेच परिश्रम घेतले. शिक्षणाची ही गंगा ग्रामीण भागात पोहचल्यामुळे त्याचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ घेता आला.
दि. बा. यावरच समाधानी नव्हते. त्यांना विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचीही चिंता होती. 10वी नंतर विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी जायचे कुठे, हा प्रश्न त्यांना सतावत होता. त्याकाळी म्हणजे 1970पर्यंत कुलाबा जिल्ह्यात फक्त अलिबाग आणि महाड येथेच कॉलेजेस होती. सर्वच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तेथे जाणे शक्य नव्हते. अशा वेळी आपल्या पनवेल, उरण भागात कॉलेज असणे फार गरजेचे आहे, हा विचार दि. बां.च्या मनात सतत घोळत होता. हाच विचार त्या वेळी त्यांचे सहकारी सर्वश्री तुकाराम वाजेकरशेठ, जनार्दन भगतसाहेब, दत्तूशेठ पाटील हेदेखील करीत होते.
अखेर या सर्वांच्या सहकार्याने दि. बा. पाटील यांनी 1970 साली पनवेलच्या सरस्वती मंदिर या माध्यमिक शाळेत कॉलेज सुरू केले. या कॉलेजच्या उभारणीसाठी ते गावोगावी फिरले. त्यांनी घरोघरी जाऊन देणग्या गोळा केल्या. याकामी त्यांना त्यांचे स्नेही एन. पी. शहा, माजी पोलीस अधिकारी सुरेश पेंडसे, भाई पोटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. आज या आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेजची भव्य आणि सुंदर वास्तू निसर्गरम्य अशा डोंबाळा येथे उभी आहे आणि यातून शेकडो विद्यार्थी निरनिराळ्या शाखेच्या पदव्या प्राप्त करून विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. यशस्वी जीवन जगत आहेत.
किंबहुना या कॉलेजसाठी देणग्या जमवण्याविषयीची एक आठवण पाटीलसाहेब नेहमी सांगत. एकदा ते देणग्या गोळा करण्यासाठी बाहेर पडले असता वाटेत त्यांना एक गरीब चर्मकार गृहस्थ भेटले. ते दि. बां.ना म्हणाले, साहेब! या कॉलेजसाठी माझी एक छोटी देणगी स्वीकाराल का? आणि त्यांनी खिशातून दीड रुपया काढून त्यांच्या हाती ठेवला. म्हणाले, ही माझ्या आजच्या दिवसाची कमाई. दि. बां.ना या घटनेचे आश्चर्य वाटले. त्यांनी त्यांची ही अल्पशी देणगी मोठ्या आनंदाने स्वीकारली. कारण रकमेपेक्षा त्यामागची त्यांची भावना त्यांना महत्त्वाची होती.                
दि. बा. दूरदृष्टीचे नेते होते. सामाजिक सुधारणा घडवून आणायच्या असतील, तर त्यासाठी प्रथम समाज शिक्षित झाला पाहिजे. तो करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे, असे ते म्हणत. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श ते नेहमी सांगत आणि त्यांच्या विचारानुसारच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी झटत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply