खारघर : प्रतिनिधी
मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात मेरा रेशन नावाचे मोबाईल अॅप लाँच केले आहे. ज्यामध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबातील लोकांना फेअर प्राईज शॉप सोबत रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती आणि रेशन कार्ड धारकांना मिळणार्या सुविधांबाबत सर्व माहिती मिळू शकणार आहे. मेरा रेशन अॅप हे अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोरवरून युजर्स हे डाऊनलोड करू शकतात. सध्याच्या घडीला कुटुंबातील एका सदस्याकडे तरी स्मार्टफोन असतो. त्यामुळे मोबाईलवर सरकारी योजना आणि मिळणारा लाभ याची पूर्ण माहिती मिळू शकते, मात्र ऑनलाइन अॅपची प्रभावी अंमलबजावणी होणेदेखील तितकेच गरजेचे आहे. मेरा रेशन मोबाइल अॅपचा वापर करणे सोपे आहे. सर्वप्रथम हे अॅप डाऊनलोड करा. गुगल प्ले स्टोरवर तुम्हाला सेंट्रल एइपीडीएस टीमद्वारा डेव्हलप केलेले अॅप मिळेल. डाऊनलोड झाल्यानंतर आपला मोबाइल नंबर यात रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड नंबर मागितले जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट करा. मग रेशन कार्डसंबंधी सर्व माहिती मिळू शकेल, तसेच या अॅपवर युजर्सना गेल्या सहा महिन्यातील ट्रान्झॅक्शन आणि आधार सीडिंगची पूर्ण माहिती तुम्हाला मोबाइलवर मिळू शकेल. नव्या कार्डसाठी या अॅपवर अर्ज करता येणार आहे, मात्र प्रत्यक्ष पुरवठा विभागात अर्ज दिल्यास त्यावर लवकर कारवाईची शक्यता आहे. मेरा रेशन अॅपमुळे देशभरात एकाच रेशनकार्ड वरून वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जाणार्या धान्यांच्या प्रकारावर आळा बसणार आहे. आपल्या जिल्ह्याच्या रेशनकार्ड धारकांची माहिती या अॅपवर इन्स्टॉल करण्यात आली आहे. स्थलांतरित रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे, असे रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी सांगितले.
पनवेल तालुक्यातील रेशन कार्डधारक : अंत्योदय – 6094, एपीएल शेतकरी – 40693, प्राधान्य – 62360