नाभिक समाजाचे देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
खोपोली : प्रतिनिधी
करोनाची दुसरी लाट सुरू आहे. सर्व व्यापार ठप्प आहेत. त्यात सलून व ब्युटीपार्लर व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने सलून उघडण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले.
चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोकण दौर्यावर आले असता, नाभिक समाजाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सुदाम शिंदे, कार्याध्यक्ष रवींद्र देवकर, उपाध्यक्ष जयंत शिंदे, सचिव अनंत खराडे, सौरभ पांडे, प्रमोद जाधव यांच्यासह अनेक ज्ञाती बांधव उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाज शिष्टमंडळाच्या व्यथा ऐकून घेतल्या व त्या शासन स्तरावर सोडविण्याचे आश्वासन दिल्याचे रवींद्र देवकर (खोपोली) यांनी सांगितले.