Breaking News

‘सवतकड्या’वर पर्यटकांचा ओघ; ई-पास रद्द केल्यामुळे नागरिकांची भटकंती

मुरूड ः प्रतिनिधी    

मुरूड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील सुप्रसिद्ध असलेला सवतकडा येथील धबधबा पर्यटकांचे व स्थानिकांचे खास आकर्षण ठरत आहे. उंच धबधबा व त्यातून उडणारे तुषार पर्यटकांना आकर्षित करतात. राज्य शासनाने ई-पास रद्द केल्यामुळे मुरूडमध्ये आता पर्यटक तुरळक प्रमाणात दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने ठाणे व पनवेल येथील पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. निसर्ग सौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुरूडला प्रतिवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. फेसाळणारे धबधबे, धुक्याच्या पाठशिवणीत व वार्‍याच्या लहरीवर झोकावणारे धुके, पावसाची रिपरिप, थंडी व ओलेचिंब भिजवणारा पाऊस, घाट व डोंगरातून पाण्याच्या ओझरणार्‍या रांगा, उंचच उंच डोंगरावर धुक्यातील झालरीतून दिसणारी हिरवाई असा सगळा रोमांचकारी अनुभव पर्यटकांना मुरूड तालुक्यात मिळतो. पावसाळा सुरू झाला की धबधब्याखाली मनमुराद भिजायचे असे चित्र असायचे, परंतु सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने पर्यटक व  स्थानिक नागरिक सवतकडा धबधब्यावर जाताना दिसत आहेत. पावसाचे प्रमाण कमी असले तरी धबधबे ओसंडून वाहताहेत. चहूबाजूने हिरव्यागार टेकड्या, वृक्षवेली या निसर्गाच्या सान्निध्यामुळे धबधब्याचे सौंदर्य खुलून दिसते. साहजिकच येथे पर्यटकांसह स्थानिकांची गर्दी दिसते.  सवतकडा येथे येण्यास पर्यटक उत्सुक असतात, परंतु येथे जाण्या-येण्याचा रस्ता होणे आवश्यक आहे. सदर रस्ता झाल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढेल. या पर्यटनस्थळाचा सर्व सुविधांयुक्त विकास व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून पर्यटनप्रेमींकडून होत आहे. येथे पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते. मुरूडच्या विकासासाठी शासनाने विशेष पॅकेजची तरतूद करून निधी उपलब्ध करून द्यावा. परिणामी पर्यटकांच्या माध्यमातून येथील स्थानिकांना रोजगार मिळू शकतो, अशी प्रतिक्रिया पर्यटक व्यक्त करीत आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply