Breaking News

सावधान! नाळ तुटत आहे

अनेकांना पदराला खार लावून त्यांची खरेदीही करावी लागली, पण पर्वा कुणाला? वास्तविक याच प्रकारचे अप्रत्यक्ष शिक्षण आपल्या देशात अत्यंत स्वस्त आणि सर्वांना उपलब्ध होऊ शकेल अशा डी. टी. एच. किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून देणे शक्य होते. ‘स्वयंप्रभा’ या केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या आणि केवळ शिक्षणासाठी वाहिलेल्या 32 शैक्षणिक दूरदर्शन वाहिन्या मात्र या वेळी कोणाच्या लक्षातही आल्या नाहीत. सहज सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘इग्नू’ सारखे दूरस्थ शिक्षण विद्यापीठ त्यांच्या ‘ज्ञानधारा’ या शैक्षणिक उपक्रमात या वाहिन्यांचा परिणामकारक उपयोग करून घेत आहे. हे जे घडत आहे ते निखालस चुकीचे आहे. शिक्षणाचीच नाळ तोडून त्याचा जीव घेणारे आहे, परंतु एकीकडे हे एवढे आणि असे ‘शिक्षणकांड’ घडत असताना दुसरीकडे बहुसंख्य विद्यार्थी व त्यांचे पालक मात्र शांत आहेत. विद्यार्थी संघटनाही थंड आहेत. विद्यार्थीहिताच्या भूमिका ठामपणे ठरवून त्या अमलात आणण्याची अंगभूत कर्तव्ये व जबाबदारी असलेली विद्यापीठे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ‘वरून’ आलेल्या आदेशांपुढे मान तुकवत आहेत. समाजातील, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ, महर्षी आणि महागुरू ‘लापता’ आहेत. शिक्षक महोदयही त्रयस्थपणे या सगळ्याकडे पाहत आहेत. त्यांचे वेतन विनाखंड सुरू आहे. सरकारदरबारी तर आला दिवस आणि आली परीक्षा ‘ढकलणे’ एवढाच उद्देश दिसतो. थातूरमातूर, वरकरणी उपाय केले जात आहेत. कारण दूरगामी धोरण ठरवावे अशी इच्छा, ताकद आणि परिस्थितीच दिसत नाही. काही तुरळकांची अस्वस्थता परिस्थितीच्या रेट्यात नाहीशी झाली असावी. एकंदरीत रोग बळावत आहे. नियतीच्या हाती सोपवला जात आहे. त्यामुळे बाह्य परिस्थिती जेव्हा कधी मूळ पदावर येईल तेव्हा गोंधळाच्या परिसीमेस तोंड द्यावे लागेल हे निश्चित. दुर्दैवाने परिस्थिती दीर्घकाळ अशीच राहिली, तर विद्यार्थी व पालकवर्गाचे हाल शब्दांत वर्णन न करण्याजोगे होतील आणि शिक्षणाने आपली मान कधीही वर होणार नाही इतकी टाकलेली असेल, असे नकारात्मकतेचा दोष स्वीकारून म्हणावेसे वाटते. या सगळ्या नन्नाच्या पाढ्यानंतर त्यावरील उपायांकडे आणि सकारात्मकतेकडे जाणे अनिवार्य ठरते. त्याचा हा विनम्र प्रयत्न. सद्यपरिस्थितीत विद्यार्थी व पालकवर्गाने हे सर्वांत आधी आणि जाणीवपूर्वक समजून घेतले पाहिजे की परीक्षा हे शिक्षणाचे अविभाज्य अंग आहे. एकलव्याच्या उदाहरणाप्रमाणे एकवेळ शिकविणे झाले नाही तरी चालेल, परंतु परीक्षा झालीच पाहिजे. परीक्षेविना विद्यार्थी म्हणजे बाटलीला झाकण न लावता बाटलीतील पदार्थ बाजारात विक्रीला पाठविण्यासारखेच होय. हेळसांड आणि नुकसान हेच त्याचे निष्पन्न. परीक्षा हे शिक्षणाचे मोजमाप आहे. ते नसेल तर स्वतः विद्यार्थ्याला आपले आत्मपरीक्षण करता येणार नाही. इतरांना समजेल असे किंवा इतरांशी तुलना करता येईल असे शिक्षणाचे संख्यात्मक रूप परीक्षेशिवाय सांगता येणार नाही. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत परीक्षा यंत्रणेने परीक्षा घेणे व विद्यार्थ्यांनी ती देणे या दोन्ही गोष्टी अनिवार्य असून टाळता येण्याजोग्या नाहीत’च’. परीक्षेविना शिक्षण पूर्णच होऊ शकत नाही. कठीण परिस्थितीतही परीक्षा देणे ही विद्यार्थ्यांची व ती घेणे ही यंत्रणेची परीक्षा आहे व ती टाळणे म्हणजे विद्यार्थी व यंत्रणेचे त्यात अनुत्तीर्ण होणे. परीक्षा हे विद्यार्थ्यांची बौद्धिक उपयुक्तता ठरविण्याचे प्रमुख साधन आहे आणि केवळ गुणपत्रके भरून परीक्षेचे हेतू अजिबातच साध्य होत नाहीत. परीक्षेचा दबाव (भीती नव्हे) आणि अधिकाधिक गुण मिळविण्याच्या ईर्षेमुळे अभ्यास खोलवर होतो आणि अशा अभ्यासातूनच ‘शिक्षण’ साध्य होते. परीक्षेच्या आधीचे काही तास व दिवस आपल्या बौद्धिक क्षमता सर्वाधिक विकसित करणारे असतात आणि प्रत्यक्ष परीक्षा कालावधीच्या शेवटच्या पाच मिनिटांत आपण ‘अतिमानव’ होतो हा अनुभव ती देणार्‍या सर्वांचाच असेल यात शंका नाही. खरंतर असे ‘क्षमता विकसन’ हेच ‘अंतर्शिक्षण’ होय. परीक्षांना फाटा देण्याने विद्यार्थ्यांच्या सदर क्षमता विकासावर व पर्यायाने शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे आणि तो कदाचित आयुष्यभराचा असू शकतो हे स्वतः विद्यार्थी आणि त्यांना जन्म व शिक्षण देणार्‍या दोन्ही पालकांनी लक्षात घ्यावे, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. परीक्षांच्या प्रश्न रोगावरचे आणखी एक महाभयंकर औषध म्हणजे परीक्षा रद्द करणे. ज्या कुणा सुपीक डोक्यांनी ही कल्पना निर्माण केली असेल त्यांना त्रिवार….. खरंतर परीक्षा आणि निकाल ही ‘सयामी जुळ्या’सारखी परस्परावलंबी जोडगोळी आहे. एक जगले तर दुसरे राहणार. परीक्षा रद्द केल्यावर निकालाचे काय होणार हे मात्र समजलेले नाही. त्यासाठी कदाचित अधिक ‘हुशार’ डोक्याची गरज असावी. परीक्षांना बगल देण्याने सर्व संबंधित घटकांचा व त्यातही विद्यार्थ्यांचा शिक्षण पद्धतीवरील विश्वास डळमळीत होण्याची भीती आहे. कठीण परिस्थितीतही व्यवस्था कायम राहणे अशा विश्वासासाठी आवश्यक असते. ‘आपण संकटात डगमगलो नाही’ ही भावना भविष्यात समाधान देणारी व पुढील कठीण परिस्थितीस नेटाने सामोरे जाण्याचे बळ देणारी असते हेही या संदर्भात लक्षात घ्यावे. म्हणून पुनश्च तात्पर्य हे की परीक्षा अपरिहार्य आहे आणि ती टाळून विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या योगाने पालकांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे हे सर्वांनी व विशेषतः विद्यार्थी व पालकांनी समजून घेतले पाहिजे. आणखी एक ‘संकट’ आणि ‘संधी’ हे आयुष्यातले खूप महत्त्वाचे दोन शब्द. समोर आलेल्या प्रत्येक बर्‍या वाईट परिस्थितीला आपण यापैकी कोणत्या शब्दाने संबोधतो व सामोरे जातो यावर अनुक्रमे आपला विनाश वा विकास अवलंबून असतो. परिस्थितीस संकट समजून ती टाळणे वा त्यापासून दूर पळणे म्हणजे आपली क्षमतावृद्धी रोखणे आणि त्याच परिस्थितीस संधी समजून तिचा पुरेपूर उपयोग करणे म्हणजे क्षमतावृद्धी करणे होय. आजची अभूतपूर्व परिस्थिती हे अनेक बाबतीत संकट असले तरी त्यात संधीही आहेत. परीक्षांच्या संदर्भात त्या घेण्याच्या व देण्याच्या नवीन किंवा अपारंपरिक (छेप-उेर्पींशपींळेपरश्र) पद्धती व कौशल्ये विकसित करण्याची ही उत्तम संधी आहे हे नक्की. भविष्यात विद्यार्थी व परीक्षा यंत्रणा या दोन्हींसाठी त्या अधिकच उपयुक्त ठरतील यातही शंका नसावी. परीक्षा टाळण्याऐवजी ती नवीन पद्धत विकसित करून घेणे दोन्ही अंगांनी फलदायी (थळप-थळप) ठरणार नाही का? सारांश परीक्षा घेणे सर्व संबंधित घटकांसाठी अनिवार्य व अनेक अंगांनी उपयुक्त आहे. म्हणून त्या व्हायलाच हव्यात. (क्रमशः)

-डॉ. श्याम जोशी, स्वेच्छानिवृत्त प्राचार्य, डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply