श्रीवर्धन : प्रतिनिधी
गतवर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन समुद्रकिनार्यावरील सुरुची 90 टक्के झाडे पडली होती. ठेकेदाराने ही झाडे कापून त्याच ठिकाणी ठेवली आहेत. त्यामुळे नवीन झाडे लावायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीवर्धन समुद्रकिनारी सुमारे 25 ते 30 वर्षापूर्वी सुरूच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. ही झाडे एवढी घनदाट होती की, त्या ठिकाणी सूर्यकिरण येतच नसत व वातावरणदेखील थंड राहात असे. पावसाळ्यात येणारा सोसाट्याचा वारा आडवण्याचे काम सुरुची ही झाडे करत होती. मात्र गतवर्षी जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा श्रीवर्धन, हरिहरेश्वर समुद्रकिनार्याला बसला. त्यात सुरुची 90 टक्के झाडे पडली आहेत. वनखात्याने जाहीर निविदा काढून श्रीवर्धन समुद्रकिनार्यावरील पडलेली सुरुची झाडे कापण्याचे व झाडांचे बुंधे काढून जमीन नवीन लागवडीयोग्य करण्याबाबतच्या कामाचा ठेका काढला होता. मात्र ठेकेदाराने झाडे कापून त्याच ठिकाणी ठेवली आहेत. जी उपयुक्त होती, ती कापलेली झाडे ठेकेदार घेऊन गेला असून, उरलेली मोठ्या व पिंजलेल्या झाडांचे तुकडे ठेकेदाराने अद्याप त्या ठिकाणीच ठेवले आहेत. कापलेल्या झाडांचे बुंधेदेखील अद्याप काढण्यात आलेले नाहीत. भविष्यात पुन्हा वादळ आल्यास श्रीवर्धन शहराचे संरक्षण करण्यासाठी समुद्रकिनारी सुरूच्या नवीन झाडांची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. जून महिन्यात पहिला पाऊस झाल्यानंतर सुरूच्या झाडांची नवीन लागवड करण्यात येईल, असे वनखात्याने सांगितले होते. मात्र ती तोडलेली सुरूची झाडे उचलून त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्याबाबत वनखात्याकडून सदर ठेकेदाराला अद्यापपर्यंत कोणतीही सूचना दिली नसल्याचे दिसून येत आहे. समुद्रकिनारी सुरुच्या नवीन झाडांची लागवड करण्यासाठी त्या ठिकाणी कापून ठेवलेली झाडे उचलून नेण्याची व परिसर स्वच्छ करून देण्याबाबत जिल्हा वनक्षेत्रपाल यांनी सदर ठेकेदाराला तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून होत आहे.