नवी मुंबई : प्रतिनिधी
कोरोना काळात हातावर पोट असणार्या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात अनेकांचे रोजगार बुडाले आहेत, तर अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यात शहरातील अंध, अपंग अशा व्यक्तिंना गेल्या वर्षभरापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हाताला कामधंदा नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न अंध व अपंग व्यक्तींना पडला आहे. इथे हाताला काम नाही आणि गावी शेती नाही त्यामुळे जगायचे तरी कसे? असा प्रश्न नवी मुंबई परिसरातील हजारोंहून अधिक अंध व अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांना पडला आहे. आज ना उद्या जीवनात मदतीचा प्रकाश कधी तरी येईल, याकडे त्यांचे डोळे लागले आहेत. नवी मुंबई शहरात जवळपास चार हजार अंपग आणि अंध व्यक्ती असून त्यांचे कोरोनामुळे हाल झाले आहेत. मदत मागायची तरी कुणाकडे, कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा? असे अनेक प्रश्न सतावत आहेत. अंध बांधव आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी नवी मुंबई परिसरात टपरी स्टॉल, खेळणी, झेरॉक्स दुकान, भाजी व्यवसाय, वडापाव विकणे, चुरमुरे, कापडी वस्तू, कंगवे, पुस्तके विकणे, लहान मुलांची पुस्तके, देव, देवतांची पुस्तके, फोटो याशिवाय रेल्वेत गाणी गाऊन चार पैसे कमावतात. कोरोनामुळे सर्व काही बंद पडले आहे. मोठ-मोठे व्यावसायिक सुध्दा या कोरोना संसर्ग काळात आर्थिक अडचणीत आल्याने हतबल झाले आहेत. त्यात अंध व अपंग कुटुंबदेखील सुटला नाही. या काळात अनेकांचा व्यवसाय हिरावला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत गेले तीन महिने सर्वच व्यवसाय बंद आहेत. राज्य शासनाकडून तूटपुंजी मदत मिळते. तीदेखील वेळेवर मिळत नाही. इतर क्षेत्रातील व्यक्तींना शासनाची मदत मिळाली, मात्र अंध व अपंगांना अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत राहावे लागले आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर फिरता येत नाही. त्यामुळे रोजगार थांबला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा असा प्रश्न समोर आहे. राज्य शासनाकडून याबाबत दखल घेतली जात नाही. त्यामुळे रेशन दुकानातून मिळणार्या दोन रुपये धान्यावर गुजराण करावी लागत आहे तर काही सेवाभावी संस्थांकडून धान्यवाटपदेखील केल्याने त्यातल्या त्यात भागले जात आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईतील निवडणुकांमुळे काही राजकीय नेतेमंडळी कडूनदेखील धान्याची मदत मिळत असल्याने किमान दोन वेळचे जेवण तरी ताटात येत असल्याचे अंध व अपंग कुटुंबीय व्यक्त करत आहेत.
कोरोना संकटात अपंग व दिव्यांग व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रबळ संघटना नसल्याने बहुतांश अंध व अपंग सोयी सुविधांपासून वंचित आहेत. राज्य शासनाने माणुसकीच्या नात्याने आमच्याकडे लक्ष द्यावे. -गणेश पांढरे, अपंग लघु व्यावसायिक, नवी मुंबई