प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… एकीकडे लोकनेते दि. बा. पाटील शेतकर्यांचा जमीन बचाव संयुक्त लढा लढवत होते तर दुसरीकडे महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी ओबीसी जनतेत जनजागृती करण्यासाठी सभा घेत होते. या दोन्ही आघाड्यांवर ते अग्रभागी असत. याच काळात त्यांनी व्ही. पी. सिंग यांच्याबरोबर महाराष्ट्राच्या विविध भागांचा दौरा करून ओबीसी जनता तुमच्याबरोबर आहे, हा विश्वास त्यांना दिला. ओबीसींच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची भूमिका मात्र वेगळी होती. 1983 साली विधिमंडळात चर्चा न करता मंडल आयोगाच्या विरोधात त्यांनी केंद्र सरकारकडे राज्य सरकारचा अहवाल पाठवून दिला. या विरोधात विरोधी पक्षनेते म्हणून दि. बा. पाटील यांनी विधिमंडळात जोरदार आवाज उठवला. सर्व विरोधी पक्षांच्या सहकार्याने सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतले आणि कामकाज रोखून धरले. त्यामुळे सार्या महाराष्ट्राचे लक्ष त्यांच्याकडे लागले. सभागृहातील ही भूमिका दि. बा. पाटील यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन जनतेपुढे जाहीररित्याही मांडली आणि सरकारच्या या कृतीचा निषेध केला. 5 सप्टेंबर 1983 रोजी एक जाहीर सभा औरंगाबाद येथे सुरू असतानाच अतिश्रमामुळे ‘दिबां’ना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने तेथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. रेडिओवरून ही बातमी ऐकताच पनवेलमध्ये त्यांच्या निवासस्थानी लोक गटागटाने जमू लागले. साहेबांच्या प्रकृतीची काळजी करू लागले. घरची मंडळीही घाबरली. त्यांनी औरंगाबादला संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण स्वीय सहाय्यकाकडून पूर्ण माहिती मिळू शकली नाही. ‘दिबां’नी त्यांना घरी कळवू नका, असे स्पष्ट बजावले होते. असा हा नेता स्वतःचे दुःख बाजूला ठेवून जनतेसाठी झटणारा, गोरगरिबांसाठी राबणारा! दि. बा. पाटील यांना दोन दिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवून नंतर मुंबईला हलवायचे होते, पण आदली रात्र त्यांना खूप त्रासाची ठरली. कारण त्यांच्याच वॉर्डमधील एक रुग्ण आरडाओरडा करून अखेरच्या घटका मोजत होता. त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते. अशा वेळी ‘दिबां’नी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता या बेपर्वाईबद्दल तेथील सर्व स्टाफला धारेवर धरले, त्यांना भरपूर खडसावले. हॉस्पिटलची बेपर्वाई त्यांना सहन झाली नाही. या घटनेचा त्यांना खूप त्रास झाला. त्यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे त्यांना तातडीने विमानाने मुंबईला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. काही दिवसांत हळूहळू ‘दिबां’वर योग्य उपचार सुरू झाले. त्यांची प्रकृती सुधारली होती. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. तेव्हा ते पन्हाळगडावर काही दिवसांच्या विश्रांतीसाठी निघून गेले, पण त्यांचे सारे लक्ष जमीन बचाव संयुक्त लढ्याकडे लागले होते. सरकार शेतकर्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळण्याबाबत कोणती भूमिका घेते? याचाच ‘दिबा’ सतत विचार करीत. शेतकर्यांना ते वेळोवेळी सूचना देत, पण वसंतदादांचे सरकार शेतकर्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करीत नव्हते. त्यामुळे संघर्ष अटळ होता. शेतकरी या संघर्षासाठी तयार होते. ते ‘दिबां’च्या आदेशाची वाट पाहत होते.
-दीपक रा. म्हात्रे ज्येष्ठ पत्रकार
RamPrahar – The Panvel Daily Paper