तळोजामध्ये सहा महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण
कळंबोली : प्रतिनिधी
सिडकोच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात असून लॉटरी पद्धतीने विक्रीदेखील केली जात आहे. मात्र सद्य स्थितीत सिडकोच्या तळोजातील गृहप्रकल्पांमध्ये पाणीटंचाईमुळे येथील सदनिकाधारकांना अडचणींचा सामना
करावा लागत आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
तळोजातील सेक्टर 21, 22, 37, 27 येथील सिडको सदनिकाधारक गेल्या सहा महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. अत्याधुनिक शहरांमध्ये सिडकोच्या माध्यमातून विविध वसाहती वसवण्यात आल्या. मात्र तळोजा भागातील गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून गृहप्रकल्पातील रहिवाशांनी लवकरच आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलेला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून टँकरदेखील वेळेवर पाणीपुरवठा सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात नसल्याचे येथील रहिवासी सांगत आहेत. त्यामुळे तत्काळ पाणी पुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा येथील रहिवाशांनी सिडकोला दिला आहे.
तळोजा विभागातील उद्भवत असलेल्या पाणीटंचाईबाबत लवकरात लवकर योग्य ती दखल घेऊन उपाययोजना केल्या जातील. -प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको