खोपोली : प्रतिनिधी
दुरूस्तीचे ग्रहण लागलेल्या खालापुरातील शासकीय विश्रामगृहावर होणारी उधळपट्टी थांबवा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापुर्वी विश्रामगृहावर थकीत बिलामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढवलेली होती. खालापूर शहरात 1984 साली महाराष्ट्र शासनाने विश्रामगृह इमारत बांधली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित विश्रामगृहाची इमारत आहे. तीनच वर्षापुर्वीच लाखो रूपये खर्चून डागडूजी आणि रंगरंगोटी करण्यात आली होती. पुन्हा कोरोना काळात महत्त्वाची कामे ठप्प असताना विश्रामगृहासाठी मात्र निधी उपलब्ध झाला आहे. एक व्हीआयपी कक्ष असताना दुसर्या कक्षासाठी तोडफोडीला सुरवात झाली आहे. लाखो रुपयांच्या उधळपट्टीचा हा प्रकार असल्याने संताप व्यक्त होत आहे. याउलट विश्रामगृहाच्या मागील बाजूस असलेल्या कर्मचारी निवासाची प्रचंड दुरावस्था झाली असून, तेथे साप व विंचूचा वावर वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी निवासस्थान दुरुस्तीला प्राधान्य देण्याऐवजी नुकत्याच झालेल्या कामाची पुन्हा तोडफोड करणे कितपत योग्य आहे असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना विचारला. परंतु त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. याठिकाणी खानसामा आणि शिपाई कार्यरत आहेत. मात्र निवासस्थानाच्या दूरावस्थेमुळे ते विश्रामगृहातील एका कोपर्यात दिवस काढत आहेत. या विषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यानी आपण मंत्रालयात असल्याने नंतर माहिती देऊ असे सांगितले.