कर्जत : बातमीदार
तालुक्यात दुबार शेतीसाठी आणि सिंचनासाठी बांधण्यात आलेली धरणे आणि पाझर तलाव गतवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षणतेने भरली नव्हती. यावर्षी तरी पुरेसा पाऊस पडून हे जलाशय ओव्हर फ्लो होतील का? याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कर्जत तालुक्यात 90 टक्के क्षेत्रावर भातशेती केली जात होती. उन्हाळ्यातदेखील भातशेती करता यावी यासाठी शासनाने तालुक्यात तीन लघुपाटबंधारे प्रकल्प उभारले. तर रायगड जिल्हा परिषदेने सहा ठिकाणी पाझर तलावांची निर्मिती केली आहे. गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सहा पैकी कशेळे किकवी आणि खांडस हे दोनच पाझर तलाव ओव्हर फ्लो झाले होते. तर उर्वरित खांडपे, डोंगरपाडा-पाथरज, सोलणपाडा-जामरुंग आणि साळोख तर्फे वरेडी येथील पाझर तलाव भरले नव्हते. माती आणि दगडांचा गाळ साठल्यामुळे कशेळे किकवी आणि खांडस या पाझर तलावांचे पाणी साठवण क्षेत्र कमी झाले. त्यामुळे हे दोन पाझर तलाव गेल्यावर्षी ओव्हर फ्लो झाले होते. कर्जत तालुक्यात सरासरी 3431 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र 2020मध्ये जेमतेम 2800 मिली पाऊस पडला. त्यामुळे पाटबंधारे विभागाने कर्जत तालुक्यात अवसरे, पाषाणे आणि पाली- भूतीवली येथे उभारलेली धरणेही गेल्यावर्षी पुर्ण भरली नव्हती. यावर्षी जून महिन्यापासून पावसाने चांगला जोर धरला असून कर्जत तालुक्यात आतापर्यंत 829 मिली पाऊस झाला आहे. निदान या वर्षीतरी तालुक्यातील सर्व जलाशये ओसंडून वाहतील, अशी येथील शेतकर्यांना अपेक्षा आहे.
गतवर्षी पाऊस कमी झाल्याने दुबार शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी संबंधीत अधिकार्यांना सारख्या विनवण्या कराव्या लागत होत्या. यंदा चांगला पाऊस होवो आणि धरणे भरून जावोत.
-मंगेश सावंत, शेतकरी, सोलनपाडा, ता. कर्जत
गतवर्षी पाऊस कमी झाल्याने तसेच पाझर तलावात आवश्यक पाणीसाठा शिल्लक ठेवायचा असल्याने शेतीसाठी पाणी सोडताना अडचणी आल्या होत्या. यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज असून सर्व धरणे, तलाव पाण्याने भरतील अशी शक्यता आहे.
-सुरेश इंगळे, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग