Breaking News

मतदान केलेल्या नागरिकांना उपचारांवर 20 टक्के सवलत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

महानगरे आणि मोठ्या शहरांतील मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत असून, मतदार जागृती आणि मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स ठेवलेल्या असून, त्याला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद देत आहेत. पनवेल परिसरातील आरोग्यक्षेत्रात योगदान देणार्‍या खारघर येथील निरामया हॉस्पिटलतर्फे 30 एप्रिल ते 6 मेदरम्यान वैद्यकीय उपचारांवर मतदान केलेल्या नागरिकांना 20 टक्के सवलत मिळणार आहे.

निरामया हॉस्पिटलने नुकतीच 10 वर्षे पूर्ण केली असून, 50 हजार रुग्णांचा टप्पा पार केला आहे. याविषयी अधिक माहिती देताना निरामया हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित थडानी म्हणाले, मतदाराचा सन्मान करण्यासाठी ओपीडी सेवा, तसेच आयपीडी म्हणजे भरती केल्यावर करण्यात येणार्‍या उपचारांवर ही सवलत उपलब्ध असणार आहे. देशामध्ये कोणत्याही ठिकाणी मतदान केलेल्या नागरिकाला ही सवलत लागू असेल.

राज्यघटनेने आपल्याला मतदान हा सर्वात मौल्यवान हक्क दिला आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावायलाच हवा, अशी भावना आजच्या तरुण पिढीमध्ये जोपासणे महत्त्वाचे असल्याचेही डॉ. थडानी यांनी सांगितले.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply