Breaking News

वादळग्रस्तांसाठी सरसावले संघ स्वयंसेवक; आळीपाळीने श्रमदान; जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

माणगाव ः प्रतिनिधी 

निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात थैमान घातले. अवघ्या तीन-चार तासांत ताशी 120 किलोमीटर वेगाने आलेला निसर्गाचा रौद्र झंझावात श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग, माणगाव, रोहा तालुक्यांची अपरिमित हानी करून गेला. या चक्रीवादळातील वादळग्रस्तांच्या मदतीला रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सरसावले असून मागील 17 दिवसांपासून विविध प्रकारे वादळग्रस्तांना मदतीचा हात देण्यात येत आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीपूर्वीच श्रीवर्धन, मुरूड, माणगाव या तिन्ही ठिकाणी सर्वेक्षणात्मक बैठका झाल्या होत्या. वादळानंतर दोन-तीन तासांनंतर स्थानिक स्वयंसेवक एकत्र आले व मदतकार्याची दिशा ठरवण्यात आली. श्रीवर्धन या तालुक्याच्या ठिकाणी रवींद्र राऊत हायस्कूल येथे जनकल्याण समितीचे मदत केंद्र कार्यान्वित झाले. तहसीलदार, नगर परिषद आयुक्त यांच्याशी समन्वय ठेवून कामाला सुरुवात झाली. अगोदरच नियोजन केल्याप्रमाणे सर्वेक्षण करून तालुक्याचे ठिकाण म्हणून श्रीवर्धन, पर्यटन प्राधान्य बाधित गाव म्हणून हरेश्वर, शेतीप्रधान बाधित गाव म्हणून मेघरे-मारळ व बागायतप्रधान बाधित गाव म्हणून आगरवेळास या गावांची निश्चिती झाली. दिघी वनवासी वस्ती व कार्ले वनवासी वस्ती या निसर्ग चक्रीवादळात पूर्णपणे कोलमडलेल्या दोन वनवासी वस्तींची नव्याने उभारणी करण्याचे नियोजन केले. कामाला सुरुवात झाल्यावर मदतकार्यात सहभागी स्वयंसेवकांचे गट नियोजन केले. महत्त्वाचे काम होते ते रस्ते व लोकांच्या बागायतीमधील वहिवाट सुरळीत करून देणे. वादळामुळे श्रीवर्धनमधील प्रत्येकाच्या बागायतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रोटा सुपारीची झाडे भुईसपाट झालीत. नारळ, आंबा यांचेही मोठे नुकसान झाले आहे. लोकांना वहिवाट करता येईल एवढी साफसफाई, वृक्षतोड स्वयंसेवकांनी केली. सात कटर आणून महाडचे धनंजय परांजपे यांनी दोघांच्या मदतीने स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले व किमान रस्ते, बागेत विहिरीत जाण्यासाठी मोकळी जागा आदी कामे सराईतपणे सुरू केली. हरेश्वर देवस्थान परिसरातील रस्ता नीटनेटका करून दिला. रायगड जिल्ह्यातील सर्व भागातील स्वयंसेवकांनी आळीपाळीने श्रमदान केले.

14 जून रोजी महाड तालुक्यातील कोथुर्डे येथील 53 वनवासी बांधवांनी एक दिवस येऊन विनामूल्य श्रमदान करून नवीन आदर्श उभा केला. उंचावरील झाडे, फांद्या कोयते व कुर्‍हाडीने  तोडण्याचे काम त्यांनी लीलया केले. श्रीवर्धन तालुक्यात सर्वांनी या कामाचे कौतुक केले. या काळात स्वयंसेवकांना आलेले अनुभव विलक्षण होते. मदतकार्यात समाजाच्या सर्व स्तरापर्यंत स्वयंसेवक पोहचले. मुस्लिम समाजानेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदत केंद्रात जाऊन नोंदणी केली. स्वयंसेवक काही पट्टीचे काम करणारे नव्हते, पण अंगीकृत कार्य तळमळीने करण्याची सकारात्मक मानसिकता ही वरचढ ठरली व अवघड काम सोपे झाले.

गावात रिक्षावाटे दवंडी देऊन लोकांपर्यंत मदतकार्याचा संदेश दिला. नोंदणीसाठी दुसर्‍या दिवशी मदत केंद्रात अक्षरशः रांग लागली होती. चक्रीवादळानंतर 10 दिवसानंतरही श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा व इतर तालुके अंधारात आहेत. विजेचे खांब व ट्रान्सफार्मर धराशायी झाल्याने शासन युद्धपातळीवर प्रयत्न करूनसुद्धा वीज येणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव व अन्य परिसरात सहा हजारांपेक्षा अधिक बॉक्स मेणबत्त्यांचे वाटप घरोघरी करण्यात आले. पाण्याचे निर्जंतुकीकरण महत्त्वाचे असल्याने घरोघरी क्लोरिनेटचे वाटप सुरू आहे. याशिवाय मच्छर अगरबत्ती व माचिसचेही वाटप सुरू आहे. निराधार कुटुंबांना अन्नधान्याचे किट तात्पुरती गरज म्हणून दिले गेले. वादळात घरांवरील पत्रे उडून घरे बोडकी झाली आहेत. पत्र्यांची गरज व बाजारपेठेतील तुटवडा लक्षात घेऊन जनकल्याण समितीतर्फे लोकांकडून नोंदणी करण्यात आली. बाजारभावाच्या 40 टक्के सवलतीने हे पत्रे गरजूंना एकास जास्तीत जास्त 16 या हिशेबाने वाटण्याचे काम सुरू आहे. अजूनही मागणी असल्याने आणखी पत्रे बाहेरून मागविले आहेत. 150 स्वयंसेवकांनी मदतकार्यात सहभाग नोंदवला. 

मदतकार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम, जनकल्याण समिती, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, किल्ले रायगड स्थानिक उत्सव समिती या परिवारातील संघटना सहभागी आहेत. विभाग प्रचारक रवी नलोडे, विभाग कार्यवाह विजय सावंत, जिल्हा कार्यवाह विष्णू केंजळे, श्रीवर्धन तालुका कार्यवाह कुणाल सावंत, सुयोग चोगले, श्रेयस पेंडसे, जिल्हा संपर्कप्रमुख गणेश मेहेंदळे, महाड तालुका संघचालक उमेश मिंडे व जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकर्ते हिरिरीने काम करीत आहेत. विश्व हिंदू परिषदेचे शरद गांगल, भारतीय मजदूर संघाचे मोहन पवार व स्थानिक सर्व संघ कार्यकर्ते कामावर लक्ष ठेवून आहेत. प्रांत प्रचारक सुमंत आमशेकर व प्रांत सेवाप्रमुख विवेक भागवत यांनी मदतकार्यास भेट दिली. सार्वजनिक वास्तू, समाज मंदिरे व रस्त्यांची स्वच्छता अग्रक्रमाने केली जाणार आहे.जनरेटर खरेदी करून श्रीवर्धन शहरातील सोसायटीमध्ये एका तासासाठी जनरेटरच्या साहाय्याने वीज देऊन पाणी व इतर मूलभूत गोष्टींची मदत नागरिकांना व्हावी यासाठी प्रयत्न आहे. श्रीवर्धनप्रमाणेच जिल्ह्यातील रोहा, तळा, माणगाव या बाधित तालुक्यांत पत्रेवाटपाचे व अन्य मदतकार्य जिल्हा सहकार्यवाह कौस्तुभ सोहनी करीत आहेत. मुरूड तालुक्यातील सर्व स्वयंसेवक तीन कटरच्या मदतीने मुरूड येथील बाधित बागांची स्वच्छता करणार आहेत. जिल्हा सेवाप्रमुख मंदार पेंडसे जनरेटरने विद्युत पुरवठा करीत आहेत. दरम्यान, अविरत परिश्रमाने या भूमीचा स्वर्ग करूया. संघगीतातील भाव प्रत्यक्षात उतरवण्याचे हे शिवधनुष्य रायगडमधील स्वयंसेवकांनी लीलया पेलले आहे. समाजाला सोबत घेऊन समाजाचे उतराई होण्याचे हे अनुपम उदाहरण सर्वांना प्रेरणादायी आहे, असे रायगड जिल्हा प्रचारप्रमुख डॉ. समीर साळुंके यांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply