महाड : प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांपासून महाड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे थांबली आहे. भाताची रोपे करपू लागली असून, चाळीस टक्यापेक्षा अधिक शेतकर्यांची लावणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाल्याने जुनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतीची कामे सुरू झाली. त्यानंतरच्या 15 दिवसांमध्ये नागरणी, पेरणीची कामे पुर्ण झाली होती. बळीराजा खुश होता, मात्र पावसाअभावी गेल्या आठ दिवसांपासून शेतीची कामे थांबली आहेत. गेल्या 24 तासांत महाड तालुक्यामध्ये 7 मिमी, तर पोलादपूर तालुक्यात 3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाड तालुक्यात आतापर्यंत सरासरी 907 मिमी पावसाची नोंद झाली असून एकूण पावसाच्या 26 टक्के पाऊस झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले. महाड तालुक्यामध्ये बहुतांशी शेती डोंगर उतारावर असल्याने पावसाचा जोर असेल तरच लावणीची कामे सोयीची होतात. खडकाळ जमिनीमुळे पाण्याचा निचरादेखील जलद होतो. सखल भागांतील अनेक शेतांमधील पाण्याचा निचरा झाल्यामुळे लावणी थांबली असल्याने शेतकर्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुवर्णा जातीच्या भाताच्या वाणाची लागवड केली जाते, या वाणाला पावसाच्या पाण्याची आवश्यकता असते, मात्र पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.