पेण : प्रतिनिधी
कृषी दिनाचे औचित्य साधून पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पेण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत 14 शासकीय व 10 अनुदानित आश्रम शाळांमध्ये गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी चौधरी यांच्या हस्ते वरवणे आश्रमशाळा परिसरात बोगनवेलची लागवड करण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, नायब तहसीलदार सुनिल जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. या वेळी निधी चौधरी यांनी शाळा व वसतीगृह इमारतींची पाहणी करुन मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच शैक्षणिक व सोयी सुविधांबाबत आढावा घेतला. आश्रमशाळांमध्ये वृक्षारोपणासाठी जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांच्याकडून बोगनवेल, डुरांटा, कोकम, आवळा, जांभुळ, सीताफळ, करंज व फुलझाडे अशी एकूण एक हजार 700 रोपे मोफत उपलब्ध करुन देण्यात आली होती. ही सर्व रोपे पेण प्रकल्प कार्यालया मार्फत सर्व आदिवासी आश्रमशाळांना देण्यात आली.