Breaking News

माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी, वाहनांच्या रांगा

कर्जत : प्रतिनिधी

पर्यटकांसाठी माथेरान खुले केल्यानंतर आलेल्या पहिल्या वीकेण्डमध्ये वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी माथेरानमध्ये शनिवारी (दि. 3) पर्यटकांची गर्दी उसळली. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीनाका परिसरात तसेच नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना माथेरामध्ये येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे केवळ पर्यटनावर अबलंबून असलेल्या स्थानिक नागरिक व व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. भाजपने केलेल्या मागणीला प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात माथेरान पर्यटकांसाठी खुले केले. त्यानंतर लॉकडाऊनमुळे अनेक महिने घरात कोंडलेल्या पर्यटकांनी शनिवारी माथेरान गाठले. त्यामुळे येथील बाजारपेठ गजबजली होती. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये उत्साह संचारला होता. पावसाळ्यात नेरळ-माथेरान मिनीट्रेन बंद असते. त्यामुळे बहुतांशी पर्यटक मोटार वाहनातून आले होते. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीनाक्यावरील वाहनतळ शनिवारी पुर्णपणे भरले होते. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. वाहन उभे केलेल्या ठिकाणापासून अनेक पर्यटक आपली लहान मुले व सामानासह माथेरानमध्ये दाखल होत होते, तर गाडी उभी करण्यासाठी जागा न मिळाल्याने नाराज झालेले पर्यटक माघारी गेले. पर्यटकांची गर्दी झाल्याने माथेरानमधील छोट-मोठे व्यावसायिक खुश होते. घोडे व्यावसायिकांतही उत्साह होता.

लॉकडाऊनमुळे आम्ही घरात बसून कंटाळलो होतो. बंदी उठवल्याने आम्ही आज गाडी घेऊन माथेरानला आलो, मात्र गर्दी असल्याने आमची गाडी घाटरस्त्याच्या तिसर्‍या टर्नवर उभी करायला लागली. 

-पी. एच. उपाध्याय, पर्यटक, मुंबई

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply