टोकियो ः वृत्तसंस्था
भारताची नॅशनल रेकॉर्ड ब्रेकर कमलप्रीत कौरने आपल्या कामगिरीतील सातत्य आणि लौकिकाला साजेसा खेळ करीत झोकात टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताला अजून एका पदकाची मोठी आशा निर्माण झाली आहे, मात्र भारतासाठी दुसरी आशा ठरलेली सीमा पुनिया सोळाव्या स्थानावर राहिल्यामुळे अंतिम फेरी गाठू शकलेली नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कमलप्रीत कौरने तिन्ही प्रयत्नांमध्ये 60हून जास्त मीटरवर थाळीफेक केली. यामध्ये तिने पहिल्या प्रयत्नात 60.29 मीटर, दुसर्या प्रयत्नात 63.97 मीटर आणि तिसर्या प्रयत्नात पुन्हा 63.97 मीटर अशी कामगिरी नोंदवली. यामुळे तिने ग्रुप बीच्या क्वालिफायर लिस्टमध्ये दुसरे स्थान पटकावत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भारताला पदक मिळू शकते.