कर्जत : बातमीदार
तालुक्यातील ताडवाडी येथील आदिवासी महिलेवर 4 फेब्रुवारी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी सह्याद्री ठाकूर-कातकरी समाज उन्नती सामाजिक संस्थेने सोमवारी (दि. 28) कर्जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ताडवाडी येथे बिगर आदिवासी कृष्णकुमार ठाकूर यांनी आपल्या जमिनीत सपाटीकरणाचे काम सुरू असल्याचे समजताच तुळसीबाई अनंता खंडवी व इतर आदिवासी महिलांनी त्याला विरोध केला. मात्र कृष्णकुमार ठाकूर याचे कामगार अमोल पाटील, गणेश गोविंद घोडविंदे व त्यांच्या पाच साथिदारांनी आदिवासी महिलावर जिवघेणा हल्ला केला. त्यात या महिला जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी तक्रार दाखल होऊनही आरोपींना पोलीस पकडत नसल्याचा आरोप आदिवासी संघटनेने केला आहे. कृष्ण कुमार ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी यासाठी आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेने सोमवारी कर्जतमधील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.