पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील गडब येथील काळंबादेवीच्या यात्रेत हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले, तर यात्रेतील प्रमुख आकर्षण असणार्या देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
सकाळी पारंपरिक पद्धतीने देवीला अभ्यंगस्नान घालून विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर चांदीचा सुशोभित मुकुट, रंगीबेरंगी कपडे, सोन्याच्या अलंकारांनी देवी श्रृंगारली गेली, तर यात्रेत खेळणी, मिठाई, शोभेच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरीची दुकाने मांडण्यात आली होती. खेळण्याच्या दुकानात लहान मुलांनी गर्दी केली होती. इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात महिलांची गर्दी, तर तरुण डिजे व ढोलाच्या तालावर नृत्य करण्यात मग्न होते.
दुपारी गडब गावातून काळंबादेवीची पालखी वाजतगाजत मंदिरात आणण्यात आली, नंतर परिसरातील गावातून वाजतगाजत आणलेल्या उंच देवकाठ्या उभारण्यात आल्या. या वेळी देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या देवकाठी स्पर्धेत जांभेळा ग्रामस्थांचा प्रथम, ज्ञानेश्वर क्रीडा मंडळा (चिर्बी)चा द्वितीय आणि मरुदेवी ग्रामस्थ-जांभेळा यांचा तृतीय क्रमांक आला.
नवसाला पावणारी काळंबादेवी अशी या देवीची ख्याती असल्याने मुंबई-ठाणे येथून, तसेच परिसरातील भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गडबमध्ये गर्दी केली होती. व्यवसाय व शिक्षणानिमित्त बाहेरगावी गेलेले ग्रामस्थही यात्रेसाठी गडबमध्ये दाखल झाले होते. काळंबादेवीचे मंदिर मुंबई-गोवा महामार्गालगतच असल्याने येथून जाणारे पर्यटकही यात्रेत सहभागी झाले होते.