देतोय भरभरून वैभव निसर्ग हा सहस्त्रकराने
नकोच सृष्टीचा विद्ध्वंस गाऊ सारे प्रेमाचे तराणे
आदिमानवापासून उत्क्रांत झालेला आजचा हा मानव आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण झाला आहे. जगभरात आधुनिकीकरणाचे वारे वाहत आहेत. घरबसल्या सर्व काही मिळण्याची उपलब्धता झाल्याने निसर्गाचा मात्र र्हास होत आहे. कारण विकासाच्या वाटेवर जाण्यासाठी मानवाने निसर्गावरच कुर्हाड चालवली आहे. वने, जंगले नष्ट केल्याने पाण्याचे प्रमाणही घटले आहे. जंगले तोडल्याने त्यात राहणार्या जंगली पशूंचा आश्रय नाहीसा झाला आहे. त्यामुळे आसर्याच्या शोधात पशू मानवी वस्तीत घुसू लागले आहेत.
केलात शिरकाव जंगलात शोधू कुठे आम्ही आसरा
शिकार करता तरी आमची बांधूनीच गळ्याला कासरा
हिरवे हिरवे रान पाहायला मिळत नाही. जिकडे पहावे तिकडे सिमेंट काँक्रीटचे जंगल, इमारती, बंगले, पूल, धरणे आणि औद्योगिकीकरणासाठी कारखाने उभारण्यात आले आहेत. या आधुनिकीकरणासाठी वृक्षांच्या मूळांवरच घाला घातला आहे. त्यामुळे सूर्याची प्रखर किरणे पृथ्वीवरील प्राणीमात्रांस अक्षरशः भाजून काढताहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवाला जगणे असह्य झाले आहे. निसर्गातील ऋतूचक्रही बदलले आहे. त्यांचाच अनिष्ट परिणाम म्हणून कधीही गारपिटीचा पाऊस पडतो. विजांचा आकाशात कल्लोळ सुरू होतो. त्यामुळे पिकांचे फळबागांचे अपरिमित नुकसान होते, हे मानवाला कधी कळणार?
नैसर्गिक अधोगतीला मानवच जबाबदार आहे. मानव विकासाच्या मार्गाने जातो की विनाशाच्या हेच कळेनासे झाले आहे. पशूपक्षी आणि इवल्याशा कीडा, कीटकांच्या जीवावर बेतले आहे. पानोपानी किलबिलणारी पाखरे आता नष्ट होऊ लागली आहेत. पाखरांच्या कितीतरी प्रजाती नामशेष होऊ लागल्या आहेत. पृथ्वीवरील तापमान प्रचंड वाढले आहे. पावसाचा निश्चित ऋतू राहिला नसून तो कधीही, कुठेही कमी-जास्त प्रमाणात बरसू लागला आहे. झुळझुळणारे ओढे, नद्या आणि ओहळ, निर्झर सूर्याच्या तप्त किरणांनी आटून गेले आहेत.
आटलेत नदी नाले ओढे झाली वसुंधरा ही वैराण
स्वार्थापायी तोडले वृक्ष का होताय आता हैराण
दर्याखोर्यातील नैसर्गिक वैभव लुप्त झाले आहे. आता सर्वत्र इमारती आणि गगनचुंबी टॉवर्स पाहायला मिळतात. नद्यांना अडविणार्या धरणांत लोकांनी ट्यूबवेल टाकून पाणी खेचून घेतल्याने धरणातील जलसाठाही संपुष्टात येत आहे. तलाव सुकून गेले आहेत. असेच विदारक चित्र गावोगावी दिसू लागल्याने पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व संपुष्टात येते की काय असे वाटू लागले आहे. मानवाने आता तरी जागे व्हावे. वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपनाचे कार्य हाती घेऊन प्रत्येकाने रोज एक तरी झाड लावणे गरजेचे आहे, तरच पुढच्या पिढीचे भविष्य सुखकर जाईल. नाही तर पाण्यासाठी आणि सावलीसाठी त्यांना वणवण भटकावे लागेल. भूजल पातळी पूर्णपणे आटली आहे. आडातच नसेल तर पोहर्यात कुठून येणार? या उक्तीप्रमाणे मनुष्य स्वतःच्या सुखसोयी उपभोगण्यासाठी भरकटत चालला आहे. भविष्याची चिंता, तमा त्याला उरली नाही. याचे विपरित परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. पुढच्या पिढीला सुखाने जगता यावे, आपल्या कष्टाचे मोल त्यांनाही मिळावे म्हणून आपण वृक्षतोड थांबवून वृक्षारोपणाचे कार्य हाती घ्यावे. त्यामुळे पाऊस आणि पाण्याची मुबलकता होईल.
पेरा बीज काळ्या मातीत अंकुरून होईल त्याचे झाड
किलबिलतील पाखरे सारी मिळे खायला फळांचे घबाड
जंगलांनी व्याप्त पर्यावरण नेहमीच आनंदाचे वाटते आणि पक्षांना वृक्षांच्या फांद्यावर झोके घेताना चिवचिवता येते. जंगलाच्या रहिवाशात पशूंची संख्याही वाढेल.
औद्योगिकीकरणामुळे कार्बन- डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फरडायऑक्साईड अशा मानवी जीवनाला घातक वायूंचे हवेतील प्रमाण वाढले आहे. आपण सण सोहळ्याच्या निमित्ताने नेहमीच वृक्षांची पाने आणि फांद्या तोडत असतो. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. जंगलात वणवे पेटत आहेत. त्यात वृक्ष जळून खाक होत आहेत अन् वन्यसृष्टीचे नुकसान होत आहे.
आदिवासी समाज आजही जंगलात मिळणार्या घटकांवर तसेच कंदमुळे, विविध पदार्थांवर आपली उपजीविका करतात. झाडांवर पाखरे, भुंगे, फुलपाखरे, मधमाशा बसून त्यातील मध जमा करत असतात. मधाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. पक्षांनी फळे खाऊन टाकलेल्या विष्ठेंमधून झाडांची पुनर्निर्मिती होत असते. फुलपाखरांमुळे परागीकरण होऊन नवनवीन रोपटी उगवलेली दिसतात. मानव हा निसर्गाचा दुरुपयोग करून घेत असतो.
सृष्टीतील हरेक जीव आपापल्या परीने निसर्गाच्या वाढीसाठी हातभार लावत असतो. वृक्षांकडून आपणांस लाकूड, फळे, पानेफुले, औषधी, लाख, मध, खैर, कात, रानमेवा असे कितीतरी पदार्थ मिळतात, परंतु आपण त्यांची फक्त कत्तलच करतो. यामुळे नैसर्गिक असंतुलन झाले आहे. ईश्वरदत्त या देणगीचा जसा आपण फायदा घेत आहोत तसे आपण त्या सृष्टीचे काही देणे लागतो असा विचार करून वृक्ष लागवड करायला हवी.
वाचवूनी पर्यावरणही सारे वृक्षारोपणाचा धरा ध्यास
नाही वाढणारच तापमान देई प्राणवायू वृक्ष तुम्हांस
जागोजागी वृक्षांची लागवड करून जोपासना केली तर त्याची मधुर फळे आपणास चाखावयास मिळतील. त्याचबरोबर पुढच्या पिढीचे आयुष्यही सुखकर होईल. बस्स! फक्त गरज आहे योग्य नियोजनाची आणि थोड्याशा अंगमेहनतीची! मग पहा हा निसर्ग सहस्त्रकरांनी त्याचे वैभव भरभरून तुमच्या झोळीत इतके टाकेल की तुमची झोळीही कमी पडावी! मग लागताय नां तयारीला?
आपण पर्यावरणाचा योग्य समतोल राखला तर पिढ्यान् पिढ्या त्याची जपणूक होईल अन वसुंधरेचे ऋण फेडण्यासाठी आपलाही हातभार लागेल. आपल्या घराच्या आसपास फुलांफळांची रोपे लावून आपण निसर्गचक्रात परिवर्तन घडवू शकतो. त्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने हार्वेस्टिंग केले तर निरनिराळे प्रयोग करून परसदारी भाज्यांचे वाफे लावू शकतो. बाहेरची रसायनयुक्त भाजी-फळे खाण्यापेक्षा घरच्या बागेत आपण नैसर्गिक फळे नि भाज्या खाण्याचे सुख काही वेगळेच! गृहिणींनी आपला दुपारचा फावला वेळ मोबाईल आणि दूरदर्शन पाहण्यात व्यर्थ न घालवता पर्यावरण संवर्धनाचे असे हितकारक उपक्रम हाती घेतले तर पैशाची बचत होईल आणि स्वतःच्या बागेतील भाज्या फळे खाण्याचे सुख पदरात पडेल.
खाऊ पौष्टिक भाज्याफळे ठेवतील ते रोगालाही दूर
गावू नाचू आनंदाने सारे मिळूनीच सुरातला सूर
-भारती दिलीप सावंत, खारघर, नवी मुंबई