अलिबाग : प्रतिनिधी
पोलीस हुतात्मा दिनानिमित्त अलिबागमधील रायगड पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे गुरुवारी (दि. 21) आयोजित पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमात रायगड पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शहीद स्मारकास जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत पोलीस शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून सलामी देण्यात आली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, पोलीस दलाचे जिल्हा अधीक्षक अशोक दुधे, अपर अधीक्षक अतुल झेंडे, उपअधीक्षक (गृह) जगदीश काकडे, अलिबाग उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, रोहा उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्यासह पोलीस दलातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी 21 ऑक्टोबर 1959 रोजी पोलीस दलातील 10 जवान गस्त घालीत असताना दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांचेवर अचानक हल्ला केला. त्याला भारतीय जवानांनी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज दिली आणि ते विरगतीला प्राप्त झाले. या वीर जवानांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभर ’पोलीस हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो.
रायगड पोलीस परेड मैदानावरील समारंभात 2020-2021 मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या एकूण 377 शहीदांना आदरांजली म्हणून हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच वीरगती प्राप्त झालेल्या अधिकारी व कर्मचार्यांची नावे वाचण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार बिर्जे यांनी केले. या वेळी राखीव पोलीस निरीक्षक दशरथ हाटकर यांच्या नेतृत्वाखाली 45 पोलीस जवान आणि बॅड पथक यांनी मानवंदना दिली.