Breaking News

टी-20मध्ये भारताची बाजी

दुसर्‍या सामन्यासह मालिकाही खिशात

सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरुद्ध लागोपाठ दुसर्‍या टी-20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने धडाकेबाज खेळ करीत सहा गडी राखून बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत हार्दिक पांड्या-श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करीत विजयाला गवसणी घातली. या विजयासह भारताने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0ने बाजी मारली आहे.
195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ मधल्या काही षटकांमध्ये अडचणीत सापडला होता. विराट कोहली माघारी परतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर जोडीने फटकेबाजी करीत कांगारूंच्या हातात आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला. हार्दिकने 22 चेंडूंत 3 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 44 धावांची खेळी करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 56 धावांची भागीदारी झाल्यानंतर अ‍ॅण्ड्र्यू टायने राहुलला माघारी धाडले. यानंतर शिखर आणि विराटने पुन्हा एकदा जम बसवत भारताच्या डावाला आकार दिला. यादरम्यान शिखरने आपली फटकेबाजी सुरू ठेवत अर्धशतक झळकावले. झॅम्पाच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात धवन बाद झाला. त्याने 36 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह 52 धावांची खेळी केली. फलंदाजीत बढती मिळालेल्या संजू सॅमनने काही चांगले फटके खेळत आश्वासक सुरुवात केली, पण त्याने विकेट फेकत भारताच्या अडचणींमध्ये भर घातली. यानंतर विराट कोहलीने पांड्याच्या साथीने सुरेख फटकेबाजी करत भारताचे आव्हान कायम ठेवले, पण अखेरच्या षटकांमध्ये धावांचे आव्हान लक्षात घेता फटकेबाजी करताना कोहली माघारी परतला. त्याने 24 चेडूंत 40 धावांची खेळी केली. यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरने फटकेबाजी करीत सामन्यात रंगत आणली आणि भारताचे आव्हान कायम ठेवले. अखेरच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी 25 धावांची गरज होती. भारतीय फलंदाजांनी हे आव्हान सहज पूर्ण केले. दोन सलग षटकार ठोकून पांड्याने विजयावर शिक्कामोर्तब केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply