Breaking News

रुग्णालयात अग्नितांडव

अहमदनगरमध्ये भीषण आगीत 10 रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर ः प्रतिनिधी
येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 6) भीषण आग लागून 10 रुग्णांचा मृत्यू, तर काही जण जखमी झाले आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली. या विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते. हे सर्व जण कोरोनाबाधित होते. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
या आगीबद्दल अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील एसीला आग लागली. बचावकार्यादरम्यान विभागातील ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे तसेच आगीमुळेही गुदमरून काही जणांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे होरपळून झाला की गुदमरून झाला याची सखोल चौकशी करण्यात येईल तसेच मृतांच्या परिवाराला आवश्यक ती मदत केली जाईल.
दरम्यान, आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दल, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महापालिकेची यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. आयसीयूत रुग्ण भाजलेल्या अवस्थेत असताना त्यांना तातडीने इतर कक्षात हलवण्यात आले. ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली, मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची सखोल चौकशी करा -देवेंद्र फडणवीस
अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो, अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply