विविध उपाययोजनेसंदर्भात आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : बातमीदार
शहरातील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी आयुक्तांकडे प्रदूषणासंबंधी तक्रार करत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यात महत्त्वाची बाबत म्हणजे रस्त्यावर साचलेली धूळ काढण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरून रस्ते धुवावेत, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यातच शहरालगत सुरू असलेल्या विमानतळाच्या कामात डोंगर-टेकड्या फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात येत असल्याने धुलीकणात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळेदेखील हवेतील प्रदूषणात भर पडत आहे. तसेच शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते या ठिकाणी होणारी वाहनांची वर्दळ ट्राफिक यामुळेही प्रदूषण वाढण्यास हातभार लागत आहे. शहरातील डोंगरभागाचा विचार केला तर त्या ठिकाणी दगडखाणी आणि उर्वरित औद्योगिक क्षेत्रात कारखाने, कंपन्या यामधून निघणारा धूर व उग्र वासाचा अनुभव स्थानिक रहिवासी घेत आहेत. एकूण सर्वच बाजूने नवी मुंबई शहराला प्रदूषणाने विळखा घातला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रदूषणावर नियंत्रण आणणे तसेच योग्य उपाययोजना करून काळजी घेणे आरोग्यदायी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल, असे पत्रात म्हटले आहे.
वातावरणातील धूळ डांबरीकरण तसेच काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर बसते. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली की पुन्हा ती धूळ वातावरणात पसरून वायू प्रदूषणास कारणीभूत ठरते. त्यासाठी पालिकेद्वारे निर्मित सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रातून निघणार्या पाण्याचा वापर नवी मुंबई क्षेत्रातील रस्ते धुण्यासाठी साफसफाईसाठी करावा. जेणेकरून धूळीमुळे होणारे वायूप्रदूषण कमी होईल.
‘पोषक ठरणार्या घटकांना अटकाव घाला’
औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना वायू प्रदूषण कमी करण्यासाठी यंत्रणा बसवण्याचे आदेश द्यावेत. तशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करावी. ठाणे-बेलापूर रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे जी वाहतूक कोंडी होते ती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित प्राधिकरणाला कळवावे, जेणे करून वाहनांमधून निघणार्या विषारी धुराचे प्रदूषण कमी होईल, असे सुधीर पाटील यांनी नमूद केले आहे.