Breaking News

पनवेलच्या ‘दिवाळी पहाट’मध्ये सप्तसुरांची उधळण

स्वरसम्राट राहुल देशपाडेंच्या सुरेल मैफिलने रसिक मंत्रमुग्ध

नवेल ः प्रतिनिधी
विरळ धुक्याची झालर, त्यात सुटलेला प्रसन्न वारा, सोबत सूर्याची सोनेरी किरणे आणि क्षितिजाला गवसणी घालणार्‍या स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुमधूर सुरांनी पनवेलकर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. या सुरेल मैफिलीचा श्रोत्यांनी कुटुंबासह आणि मित्रपरिवारासोबत मनमुराद आनंद घेतला आणि भरभरून दादही दिली.
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रम शहरातील नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या वडाळे तलावाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या वेळी सात्विक, आल्हाददायी व मनमोहक वातावरणात राहुल देशपांडे यांनी सप्तसुरांची उधळण केली. त्याचा पनवेलकरांनी आस्वाद घेतला. श्रोतेगण म्हणून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, वैद्यकीय आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी या वेळी उपस्थित होती. उत्तम नियोजनामुळे या कार्यक्रमाला चार चांद लागले. त्यामुळे सर्व श्रोत्यांनी आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले.
दिवाळी पहाटेचे एक अनोखे नाते आहे. दिवाळी अंकांसोबतच मराठी-हिंदी भावस्पर्शी गाण्यांनी दिवाळीची पहाट सुरेल करण्याची परंपरा आहे.
या कार्यक्रमात नाट्यसंगीत, अभंग, भक्तिसंगीत, सिनेगीते राहुल देशपांडे यांनी सादर केली. त्यांनी आपल्या दिलखेच अदाकारी व बहारदार गायनाने रसिकांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यामुळे दिवाळी पहाटेचा हा अनुभव पुढील अनेक दिवसांसाठी नवा उत्साह देणारा ठरला.
’अलबेला सजन आयो रे’, ’दिल कि तपीश’, ’सूर निरागस हो’, ’कानडा राजा पंढरीचा’, ’वल्लभा लक्ष्मी वल्लभा’ अशा वैविध्यपूर्ण संगीताचा नजराणा पेश होत असताना तबला, पेटी, पखवाज अशा वाद्यवृंद समूहानेही आपल्या वादनातून उपस्थितांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आवर्जून उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, मनोज भुजबळ, हरेश केणी, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका दर्शना भोईर, चारूशीला घरत, रूचिता लोंढे, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, माजी नगरसेविका मंदा भगत, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष वर्षा नाईक, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत दिसले यांच्यासह आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी तसेच नागरिक कुटुंबीयांसह हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळी पहाटचे यंदाचे पाचवे वर्ष होते. कोरोना संदर्भातील शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून अत्यंत शिस्तप्रिय हा कार्यक्रम झाला. संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply