
अहमदनगर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. तसेच वेळोवेळी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांमधील नेतेही एकमेकांवर टीका करतानाही पाहायला मिळाले. यातच आता काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आता शरद पवार यांच्यावलर जास्त हक्क सांगू नये. किती दिवस तुम्ही शरद पवारांचा आधार घेणार, अशी खोचक विचारणाही थोरात यांनी केली.
श्रीगोंदा येथील माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार केंद्रात कृषीमंत्री होते, तेव्हा मी राज्यात कृषीमंत्रीपद मागून घेतले होते. कारण, केंद्रात शरद पवार असल्यामुळे राज्यात काही कमी पडणार नाही, हे मला माहिती होते. मला शेजारी बसवून ते संपूर्ण राज्यातील कृषी मंत्र्यांशी चर्चा करायचे. कारण मला शेतीतील समजावे हा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आता शरद पवारांवर जास्त हक्क सांगू नये. किती दिवस शरद पवारांचा तुम्ही आधार घेणार, असा मिश्लिक टोला थोरातांनी लगावला.