Breaking News

रायगडचे किनारे हाऊसफुल्ल; दिवाळीच्या आनंदाबरोबरच पर्यटक घेताहेत मोकळा श्वास

अलिबाग : प्रतिनिधी

कोरोनाची साडेसाती संपली नसली तरी त्याचा प्रभाव खूपच कमी झाला आहे. त्यामुळे आता पर्यटक घराबाहेर पडले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी रायगडच्या किनार्‍यांची निवड केली आहे. त्यामुळे रायगडातील सर्वच किनारे आता गर्दीने फुलून गेले आहेत. रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि नारळी पोफळीच्या बागा यामुळे रायगडचे किनारे पर्यटकांचे नेहमीच आकर्षण ठरले आहे, परंतु कोरोनामुळे हे किनारे ओस पडले होते. आता दिवाळीत मात्र पर्यटकांची पावले पुन्हा रायगडकडे वळली आहेत. मुंबई पुण्यासह राज्यभरातील पर्यटकांनी इथे गर्दी केली आहे. शहरी भागात कोरोनानंतर थोडीफार मोकळीक मिळाली असली, तरी भीतीमुळे आजही घुसमट होत आहे. त्यातच अनेक निर्बंध अजूनही कमी झालेले नाहीत. त्यातून दोन-चार दिवस निवांत स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी लोक घराबाहेर पडले आहेत. निमित्त दिवाळीचे असले तरी पर्यटक रायगडच्या किनार्‍यांवर मोकळा श्वास घेताना दिसत आहेत. वेगवेगळे वॉटरस्पोर्ट्स, उंटसवारी, घोडागाडी यामुळे बच्चे कंपनीच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. कोरोनामुळे रायगडचा पर्यटन व्यवसाय व्हेंटिलेटरवर होता या व्यवसायातील अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत, पण दिवाळीपूर्वीच रायगडचे जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढून सर्व किनारे व पर्यटनस्थळे पर्यटनासाठी खुले केले. आता अलिबागसह नागाव, किहीम, काशीद, दिवेआगर, मुरूड इथल्या किनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी झालेली पहायला मिळते आहे. परवानगी दिल्यानंतर हळूहळू पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर येतो आहे. त्यामुळे व्यावसायिक खूश आहेत. आगामी काळात ही गर्दी आणि व्यवसायदेखील वाढेल, असा अंदाज आहे. कोरोनानंतर अलीकडच्या काळात शाळा ऑफलाईन सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यंदा दिवाळीची सुटी कमी आहे. अनेक शाळा 11 तारखेपासून तर काही 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीला मौजमजा करण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. परिणामी मिळालेल्या अल्पावधीत जास्तीत जास्त आनंद लुटण्याकडे पर्यटकांचा प्रयत्न आहे. कोरोनानंतर आलेल्या इंधन दरवाढीमुळे खाद्यपदार्थ, निवास व्यवस्थेचे दर वाढतील, असा अंदाज होता, परंतु हे दरदेखील स्थिरच राहिल्याने पर्यटक समाधानी आहेत.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply