Breaking News

शाळांच्या दुरुस्तीस विशेष निधी द्या; आमदार निरंजन डावखरे यांची मागणी

अलिबाग ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाचा कोकणातील शाळांच्या इमारतींना मोठा फटका बसला असून इमारतींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. त्याचबरोबर खासगी अनुदानित शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून खर्च करण्यास परवानगी देण्याची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील शैक्षणिक संस्थांना प्रचंड फटका बसला. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळांवरील कौले व पत्रे उडाली. त्याचबरोबर शाळांच्या इमारतींचेही मोठे नुकसान झाले. सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यातही शाळांचे नुकसान झाले. अशा स्थितीत  गणेशोत्सवापर्यंत शाळा सुरू होणार नसल्याचा अंदाज आहे. नुकसान झालेल्या इमारतींच्या दुरुस्तीनंतरच शाळा पुन्हा सुरू करता येतील. त्यासाठी राज्य सरकारने दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे

केली आहे. सरकारी शाळांबरोबरच खासगी अनुदानित आणि खासगी विनाअनुदानित शाळांचेही नुकसान झाले आहे. त्यात विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षण देणार्‍या संस्थांची स्थिती वाईट आहे. खासदार निधीमधून खासगी अनुदानित शाळांसाठी दुरुस्तीची कामे हाती घेता येतात, मात्र आमदार निधीसाठी तशी तरतूद नाही. तरी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून खासगी अनुदानित शाळांच्या दुरुस्तीसाठी आमदार निधी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रात केली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply