Breaking News

उरलीसुरली अब्रू

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा पुरता पर्दाफाश झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारी महाविकास आघाडीच्या खुर्चीखाली जबरदस्त बॉम्ब फोडला. त्याने सत्ताधारी आघाडीची उरलीसुरली अब्रूदेखील धुळीला मिळाली आहे. गेले काही महिने नवाब मलिक यांनी विविध आघाड्यांवर खरीखोटी सरबत्ती सुरू ठेवली होती. आर्यन खान प्रकरणानंतर अमलीपदार्थ प्रतिबंधक विभागातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर त्यांनी वैयक्तिक हल्ले चढवले. मलिक यांच्या जावयाला गांजा सापडल्याप्रकरणी आठ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगाची हवा खावी लागल्यामुळे अमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग (एनसीबी) त्यांच्या निशाण्यावर होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्याविरुद्ध देखील अतिशय हीन पातळीवरचे वैयक्तिकहल्ले मलिक यांनी केल्यावर मात्र चित्र बदलले. मलिक विरुद्ध एनसीबी यांच्यात रंगलेल्या युद्धामध्ये भारतीय जनता पक्षाला उतरण्याचे काहीही कारण नव्हते आणि भाजपच्या नेत्यांनी ते कटाक्षाने टाळले देखील. समीर वानखेडे यांना चारित्र्याचे प्रमाणपत्र देणे हे आमचे कामच नाही, असे भाजपचे नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले होतेच, परंतु मलिक यांच्या आरोपांचा भडिमार फडणवीस यांच्याकडे वळल्यानंतर भाजप गप्प बसणे शक्यच नव्हते आणि तसेच घडले. दिवाळीनंतर मलिक यांच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट करू असे फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे मंगळवारी हा बॉम्ब फुटला. सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल या दोघा गुन्हेगारांसोबत जमिनीचे व्यवहार केल्याची कागदपत्रे फडणवीस यांनी पत्रकारांसमोर ठेवली. 2003 ते 2005 या काळात गोवावाला कम्पाऊंड या तीन एकराच्या मालमत्तेची खरेदी मलिक यांच्या कंपनीने अवघ्या 20 लाखांत कशी केली याची सुरस आणि रंजक कहाणी फडणवीस यांनी सांगितली. सरदार शाह वली खान याचा 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत सक्रिय सहभाग होता आणि हा देशद्रोही इसम सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सलीम पटेल हा हसिना आपा या दाऊद इब्राहिमच्या बहिणीचा चालक आणि उजवा हात. अनेक मालमत्तांच्या पॉवर ऑफ अटर्नी (मुखत्यार पत्रे) या सलीम पटेलच्याच नावावर असत. गोवावाला कम्पाऊंडची मालमत्ता अशीच वादग्रस्त होती. मलिक यांनी मंत्री असतानाच्या काळात हा व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. देशद्रोहाच्या कलमाखाली आरोपी असलेल्या संशयितांबरोबर व्यवहार करण्याची कुठली गरज मलिक यांना होती हा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. खरे तर एवढा गंभीर आरोप झाल्यानंतर नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणे इष्ट ठरेल, परंतु तसे ते करणार नाहीत हे उघडच आहे. सध्या गजाआड असलेले महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील न्यायालयाचा दणका बसल्यानंतरच राजीनामा सुपूर्द केला होता. फडणवीस यांच्याबद्दल हायड्रोजन बॉम्ब फोडू अशी डरकाळी नवाब मलिक यांनी मारली आहे, ती हास्यास्पद वाटते. फडणवीस यांनी केलेल्या आरोपांतील महत्त्वाच्या गोष्टी मलिक यांनी अप्रत्यक्षपणे कबूलच केल्या आहेत. उदाहरणार्थ शाह वली खान सोबत व्यवहार केला होता हे त्यांनी मान्यच केले आहे. आता यापुढे हायड्रोजन बॉम्बचा प्रश्न येतोच कुठे? राजीनामा देऊन तपास यंत्रणांच्या चौकशीसाठी रुजू होण्यापलीकडे मलिक यांना पर्याय उरलेला नाही.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply