खोपोली : प्रतिनिधी
पॅरामेडीकल कोर्स करीता प्रवेश मिळवून देतो, असे सांगून एका भामट्याने सुमारे तीन लाख 26 हजार 980 रुपये उकळण्याची घटना खालापूर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून फसवणूक करणारा आरोपी यासिन करीम शेख (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वलेहा अफजलखान (वय 27, रा. खालची खोपोली) यांचा भाऊ शोएब याला मुंबईतील जेजे रुग्णालयात पॅरामेडीकल कोर्स करीता प्रवेश मिळवून देतो, असे यासीन शेख याने सांगितले होते. त्यासाठी यासिन याने वेळोवेळी पैशाची मागणी केली. यासिन फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्वलेहा हिने यासिनला दिलेले तीन लाख 26 हजार 980 रुपये परत मागितले. मात्र यासीन याने पैसे परत न करता स्वलेहा हिला शिवीगाळी करून दमदाटी केली. या बाबत स्वलेहा हिने दिलेल्या तक्रारीवरून यासिन शेख विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420,407,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक एम. काळसेकर करीत आहेत.