खोपोली ़: प्रतिनिधी
कर्जत-खोपोली रस्त्यावर केळवली गावाजवळ काल रात्री एका ऑइल टँकरला आग लागली. या टँकरमध्ये खोबरेल तेल असल्याने, काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे परिसरात आगीचे लोट उठले होते. अग्निशमन दल व बचाव पथकाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. खोबरेल तेल भरलेला टँकर (एनएल-01,एई-9039) कर्जतकडून खोपोलीच्या दिशेने जात होता. केळवली गावाजवळ टँकरला अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवत टँकर रस्त्याच्याकडेला थांबवला व खाली उडी मारली. या आगीने थोड्यावेळातच रौद्र रूप धारण केले. 16 टायरच्या या टँकरचे पाच टायर अर्ध्या तासात फुटले. या घटनेचे वृत्त समजताच कर्जत व खोपोली याथील अग्निशमन दल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सेवाभावी संस्थेचे सदस्य व ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीत जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.