Breaking News

जमिनीच्या वादातून हाणामारी

आणखी एका आरोपीस अटक

कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदार – कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथील जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका शेतकर्‍याला गंभीर दुखापत करून फरार झालेल्या लोणावळा येथील आरोपीला यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे, तर कर्जतमधील मुद्रे विभागात राहणार्‍या आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबईतील ठक्कर नामक व्यक्तीने गौळवाडी येथे रीतसर खरेदी खत करून जमिनी विकत घेतल्या असल्या तरी काही जमिनींवरील सातबारा उतार्‍यावर ललित कांतीलाल सालेशा यांच्या वडिलांचे नाव आहे. त्या जागेवर ठक्कर यांनी घातलेले कंपाऊंड सालेशा यांनी तोडून झोपडी बांधली होती. झोपडी तोडण्यासाठी व तोडलेले कंपाऊंड जोडण्यासाठी ठक्कर यांच्या सांगण्यावरून 3 नोव्हेंबर रोजी चारचाकी वाहनातून लोखंडी रॉड व काठ्या घेऊन 25 ते 35 वयोगटातील 10-12 इसम आले होते. त्यांनी सालेशा यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली. यानंतर सर्व जण फरार झाले.

याबाबत सालेशा यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. सर्व जण अनोळखी असल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे आव्हान होते. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण भोर आणि अन्य पोलीस शिपायांना आरोपींचा सुगावा लावण्यात यश आले. त्यांनी काही दिवसांपूर्वी या टोळीतील दिलीप कमलाकांत दुबे (45) याला लोणावळ्यातून अटक केली, तर याच गुन्ह्यात सहभागी व बर्‍याच दिवसांपासून फरार असलेल्या मुद्रे विभागात राहणार्‍या अनिरुद्ध यशवंत पवार (28) याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply