अलिबाग ़: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड जिल्हा आणि सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे आयोजित दीपसंध्या या कार्यक्रमात बुधवारी (दि. 10) सायंकाळी उदयोन्मुख गायक ओमकार प्रभुघाटे आणि कल्याणी शेट्ये यांनी गाणी सादर करून अलिबागकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. अलिबाग येथील भाजप मुख्यालयासमोर या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला अलिबागकर रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. नमन नटवरा… या नांदीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. गायक ओमकार प्रभुघाटे आणि कल्याणी शेट्ये यांनी आपल्या सुमधूर आवाजात सदर केलेल्या एकापेक्षाएक सरस गाण्यांनी ही मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. ओमकार प्रभुघाटे यांनी सादर केलेली ’सरुत प्रियाकी…’, ’ बगळ्यांची माळ फुले…’, ’गुंतता हृदय हे कमल दलाच्या पाशी…’, ’बहुतदिन नच भेटलो सुंदरीला …’ ही गाणी उपस्थित रसिकांची दाद मिळवून गेली. कल्याणी शेट्ये यांनी ’उगवला चंद्र पुनवेचा …’, ’भेटीलागे जीवा लागलीसी आस …’, ’ अवचीता परिमुळू झुळकला अळूमाळू …’, ’ॠतूराज आज वनी आला …’ ही गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली. ओमकार प्रभूघाटे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी गायलेल्या अवघे गरजे पंढरपूर … या अभंगात रसिक तल्लीन झाले. ओमकार प्रभुघाटे व कल्याणी शेट्ये यांना धनंजय पुराणिक (तबला), सुशील गद्रे (संवादिनी), गणेश मेस्त्री (मृदुंग) यांनी उत्तम साथ दिली. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस मिलींद पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, शहर अध्यक्ष अॅड. अंकित बंगेरा, हेमंत दांडेकर, राजेश मापारा, केदार आठवले आदि या वेळी उपस्थित होते. बाल गिर्यारोक शर्मिका म्हात्रे हिचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.