महिला गटात अलिबागची बाजी
अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथे स्व. मधुकर ठाकूर क्रीडा नगरीत घेण्यात आलेल्या रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धेत पुरुषांच्या गटात सेव्हन स्टार बोर्ली-मांडला (ब) संघाने आणि महिला गटात सेंट मेरीज हायर सेकंडरी कॉन्व्हेंट स्कूल अलिबागने आद्य सप्लायर्स चषक 2021वर नाव कोरले.
दुसरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धा नुकतीच हाशिवरे शाळेच्या क्रीडांगणावर घेण्यात आली. अमित नाईक मित्र मंडळ सारळ आणि आद्य सप्लायर्स म्हात्रोळी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेला जिल्हाभरातून पुरुषांचे आणि महिलांचे असे एकूण 46 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक अमित नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेला खारेपाटातील विविध स्तरातील मान्यवर, आजी-माजी सरपंच व खेळाडू उपस्थित होते.
स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. पुरुष गटात अंतिम सामना सेव्हन स्टार बोर्ली मांडला (ब) आणि मिडल एज पेण या दोन संघात झाला. अटीतटीच्या लढतीत बोर्ली मांडला (ब) संघाने विजेतेपद पटकाविले. मॉडेल रांजणखार संघ तिसर्या, तर सेव्हन स्टार बोर्ली मांडला (अ) संघाने चौथा क्रमांक मिळविला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून पेण संघाच्या तुषार सावंतला आणि उत्कृष्ट नेटमन म्हण्ाून बोर्ली मांडला (ब) संघाच्या अब्दुल रहिमानला सन्मानित करण्यात आले.
महिला गटात सेंट मेरीज हायर सेकंडरी कॉन्व्हेंट स्कूल अलिबाग आणि पनवेल तालुका डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्यात अंतिम सामना झाला. यात अलिबाग संघाने बाजी मारून विजेतेपद पटकाविले. महिलांच्या सामन्यांमध्ये अलिबागची योगिता भोईर उत्कृष्ट खेळाडू ठरली, तर पनवेलची समीक्षा सकपाळ हिला उत्कृष्ट नेटमन म्हणून गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. प्रवीण ठाकूर आणि आद्य सप्लायर्सचे उद्योजक अमित नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.