Breaking News

‘मनचली’ऽ 50

अच्छाजी… लीना चंदावरकरचा लाडिकपणा

गोष्ट अशी आहे, लीनाची (लीना चंदावरकर) फार असलेली वडिलोपार्जित मालमत्ता तिच्या पालकांच्या मृत्यूनंतर तिचे काका (कृष्णकांत) व काकी (निरुपा रॉय) सांभाळताहेत. लीनाचा स्वभाव बेभरवशाचा आहे. त्यामुळेच ते म्हणतात, तिचं लग्न झाल्यावर आणि ते टिकल्यावर ती मालमत्ता तिला मिळेल. अशातच तिची ओळख सुशीलकुमार (संजीवकुमार) याच्याशी होते. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि आपण ही मालमत्ता मिळेपर्यंत लग्नाचे नाटक करायचे ठरवतात. सगळा प्लॅन छान जमून येतो, पण अशातच सुशीलकुमार म्हणतो, अर्धी मालमत्ता माझी झाली पाहिजे, तर मी हे नाटक थांबवेन. आता आली का पंचाईत… हे सगळं गंमत जंमतमध्ये घडते आणि मस्त मनोरंजन होते. राजा नवाथे दिग्दर्शित ’मनचली’ या चित्रपटाचे हे धमाल मध्यवर्ती कथासूत्र. हा चित्रपट 23 नोव्हेंबर 1973 रोजी सेन्सॉर संमत झाला (गुगलवरची तारीख ही आहे) आणि मुंबईत हा चित्रपट 4 जानेवारी 1974 रोजी प्रदर्शित झाला. पन्नास वर्ष पूर्ण झाली. मुंबईत या चित्रपटाने मिनर्व्हा चित्रपटगृहात शंभर दिवसांचे झक्कास यश संपादले. संजीवकुमार व लीना चंदावरकरचा हा म्युझिकल रोमॅन्टीक चित्रपट. चित्रपटाची कथा सत्येन्द्र सराफ यांची, लेखन कृष्ण चंद्रन यांचे, तर पटकथा ग.रा. कामत यांची. दिग्दर्शन राजा नवाथे यांचे. छायाचित्रणकार फली मिस्री. दिग्दर्शक राजा नवाथे हे ’आग’ (1948) आणि ’बरसात’ (1949) या चित्रपटांच्या वेळेस राज कपूरचे सहाय्यक दिग्दर्शक होते. दिग्दर्शक म्हणून फोकस्ड शिक्षण घेण्यास उत्तम प्लॅटफॉर्म. आर.के. फिल्म निर्मित आहे (1953)पासून ते स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून कार्यरत झाले. मग ’बसंत बहार’ (1956), ’सोहनी महिवाल’ (58), ’गुमनाम ’ (65), ’पत्थर के सनम’ (67), ’भाई भाई’ (70) या चित्रपटानंतर त्यांचा ’मनचली’ आला. या सर्व चित्रपटातील संगीत जमेची बाब. ’मनचली’ची गाणी आनंद बक्षी यांची, तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे. ’ओ मनचली कहां चली’ (पार्श्वगायक किशोरकुमार) सर्वकालीन लोकप्रिय. तन मन धन सबकुछ तेरा (मुकेश), गम का फसाना (किशोरकुमार व अधेमधे लाडे लाडे लीना चंदावरकर), कली कली घुमे (लता मंगेशकर), मिले कहीं दो अजनबी (किशोरकुमार) या गाण्यांनी रंगत वाढवली. विशेष उल्लेखनीय गोष्ट, चित्रपटात श्रीकांत मोघे यांचीही भूमिका आहे.
’मनचली’ म्हणताच लीना चंदावरकर हे हिट समीकरण. ’मिस्टर इंडिया’ म्हटलं की श्रीदेवी, ’तेजाब’ म्हटलं की माधुरी दीक्षित, ’रंगीला’ म्हटलं की उर्मिला मातोंडकर अशी ही परंपरा. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटात लीना चंदावरकरच्या सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांची छान केमिस्ट्रीचा ठसा उमटलाय. लीना मुळची कर्नाटकातील धारवाड येथील. शाळेत असताना एकदा निबंधात प्रश्न होता, मोठेपणी कोण व्हावेसे वाटते? लीना चंदावरकरने उत्तर दिले, चित्रपट अभिनेत्री. ते उत्तर न आवडल्याने वर्गशिक्षकेने तिला चक्क मारले. लीनाच्या डोळ्यासमोर लक्ष निश्चित होते. ती वयात आली असतानाच 1968 साली मुंबईत फिल्म फेअरच्या टॅलेंट हंट स्पर्धेत तिला यायचे होते, पण चित्रपटसृष्टी हे अतिशय ’बदनाम क्षेत्र’ आहे म्हणतच तिच्या निर्णयास विरोध केला. तो कसाबसा मावळल्यावर ती मुंबईत आली, नवीन चेहर्‍यांच्या स्पर्धेत ती मागे पडली आणि चित्रपट मिळवण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. त्यात तिला काही मुद्रित माध्यमातील जाहिरातीत ’दिसण्याची’ संधी मिळाली. सुनील दत्तच्या पाहण्यात त्यातील एक जाहिरात आली. तेव्हा सुनील दत्त आपल्या अजंठा आर्टस बॅनरखाली मसिहा या नवीन चित्रपटाच्या निर्मिती व दिग्दर्शनाची तयारी करीत होता. राजकुमार, स्वतः सुनील दत्त, मुमताज आणि लीना चंदावरकर अशी स्टार कास्ट, पण हा चित्रपट घोषणेवरच थांबला. काही दिवसांनी सुनील दत्तने मन का मीत या चित्रपटाच्या निर्मिती व दिग्दर्शन यांची तयारी सुरू केली. यात तीन नवीन चेहरे. नायक सोम दत्त (हा सुनील दत्तचा भाऊ), नायिका लीना चंदावरकर व खलनायक विनोद खन्ना. एका तमिळ भाषेतील चित्रपटाचा रिमेक. लीना चंदावरकरला मूळ चित्रपट पाहताना वाटले ही भूमिका आपल्याला जमणार नाही. तसे पोशाख आपल्याला शोभणार नाहीत. त्यामुळे आपल्या पहिल्याच चित्रपटात काम करण्यास लीना कचरत होती. तो काळ आजच्याइतका मोकळा ढाकळा नव्हता आणि तेच चांगले होते. मूळ चित्रपटात जे केलयं तेच आपण करायचं यात काही संकोच हवाच होता. अखेर नर्गिस दत्त यांनी लीनाला विश्वासात घेत यात इतकं घाबरून जाण्यासारखे काही नाही. अगदी आत्मविश्वासाने वावर अशी समजूत घातल्यावर लीना तयार झाली. तरीदेखील काही मर्यादा पाळल्या. हा चित्रपट 1969 साली प्रदर्शित झाला. लीना चंदावरकरने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं तेव्हा वहिदा रेहमान, नूतन, माला सिन्हा, साधना, तनुजा, शर्मिला टागोर, मुमताज, सायरा बानू यांची चलती होती आणि लीना चंदावरकरच्या आगे-मागे बबिता, हेमा मालिनी, रेखा, राखी, जया भादुरी, मौसमी चटर्जी, जाहिदा, झीनत अमान यांनी रूपेरी पदार्पण केले, म्हणजेच लीना चंदावरकरसमोर तगडी स्पर्धा होती आणि त्यातही तिने आपले स्थान पक्के केले याचे विशेष कौतुक करायला हवेच. पारंपरिक रूपाकडून मॉडर्न फॅशनेबल लूककडे हिंदी चित्रपटातील नायिकांचा प्रवास सुरू झाला होता. रसिकांनी मन का मीत चित्रपट पूर्णपणे नाकारला तरी लीना चंदावरकर आणि विनोद खन्नाची करियर मार्गी लागली. सोम दत्त याला मात्र पडद्याआड जावे लागले. लीना चंदावरकरचे करिअर सुरू झाले आणि रामन्ना दिग्दर्शित ’हमजोली’ (1970)च्या खणखणीत रौप्यमहोत्सवी यशाने लीना चंदावरकर स्थिरावली. मला आठवतंय आमच्या गिरगावातील सेन्ट्रल थिएटरमध्ये ज्युबिली हिट यश संपादले. यातील जितेंद्रसोबत तिने ढल गया दिन हो गई शाम या गाण्यात टेनिस खेळत, तर हाए रे हाए नींद नही आए चैन नही आए या पाऊस गीतात प्रचंड चिंब भिजून झक्कास नृत्य करून रसिकांचे लक्ष वेधले. पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटासाठी लागणारे गुण लीना चंदावरकरकडे असल्याने तिची वाटचाल रंगू लागली. आकार घेऊ लागली आणि व्यावसायिक वृत्तीने तिला नवीन चित्रपट मिळत गेले. एकीकडे मुंबईतील चित्रपट निर्माते, तर दुसरीकडे चेन्नईतील (तेव्हाचे मद्रास) अशी दुहेरी संधी तिला मिळाली. त्यातील मै सुंदर हू (हिरो विश्वजीत.. मुझको थंड लग रही है गाण्यातील लीना चंदावरकरची मोहकता त्या काळात फोटोतूनही दिसे. पडद्यावर तर केवढे तरी आकर्षक), रखवाला (धर्मेंद्र), मनचली आणि अनहोनी (संजीवकुमार), एक कुंवारा एक कुंवारी (राकेश रोशन), बिदाई (जितेंद्र) या चित्रपटांनी उत्तम यश मिळवले. तिचा चाहतावर्ग वाढत गेला. अर्थात, कोणत्याही कलाकाराचे सगळेच चित्रपट सकस नसतात आणि सरस यश प्राप्त करीत नसतात. लीना चंदावरकरबाबतही हे झाले. खरंतर राजेश खन्नाची क्रेझ असतानाच्या काळात लीना चंदावरकरवरचा त्याच्यासोबतच्या ’मेहबूब की मेहंदी’ (1971)मधील गाणी आजही सुपर हिट आहेत, पण एच. एस. रवैल दिग्दर्शित हा चित्रपट रसिकांनी पूर्णपणे नाकारला. दिग्दर्शक रवैल ’मेरे मेहबूब’च्या यशाची पुनरावृत्ती करण्याच्या मूडमध्ये होते, पण या वेळी भट्टी जमली नाही. हनिमून (राकेश रोशन), इमान आणि अपने रंग हजार (दोन्ही संजीवकुमारसोबत), एक महल हो सपनो का (धर्मेंद्र), जग्गू (शत्रुघ्न सिन्हा), आफत (नवीन निश्चल), नालायक (जितेंद्र) असे तिचे आणखी काही चित्रपटही रसिकांनी नाकारले. यातील काही चित्रपट तिने का बरे स्वीकारले हा प्रश्नच होता. हिंदी चित्रपटसृष्टीत यश म्हणजेच बहुत कुछ असते हे सर्वकालीन सत्य. लीना चंदावरकरच्या इतर काही फ्लॉप्सच्या गोष्टी रंजक आहेत. प्रत्येक पिढीतील तारकांचा एक कल सिनियर हीरोसोबत रूपेरी पडद्यावर रोमॅन्टीक दृश्ये साकारावीत याकडे असतो. त्या हिरोंना त्या शाळा कॉलेजच्या वयापासून रूपेरी पडद्यावर पाहत आलेल्या असतात. लीना चंदावरकर यास अपवाद कशी असेल? तिने शम्मी कपूरसोबत शक्ती सामंतांचा ’जाने अनजाने’ (1971) आणि भप्पी सोनी दिग्दर्शित ’प्रीतम’ (1972. यात लीना चंदावरकरची दुहेरी भूमिका होती) असे दोन चित्रपट स्वीकारले. ’जाने अनजाने’ तिने खरंतर ’मन का मीत’च्या प्रदर्शनानंतर लगोलग स्वीकारला, पण हा चित्रपट काही कारणास्तव रखडला, दरम्यान शक्ती सामंतांच्याच ’आराधना’ (1969)च्या खणखणीत यशाने राजेश खन्नाची क्रेझ निर्माण झाली आणि शम्मी कपूरचा धसमुसळा हीरो मागे पडत गेला. चित्रपटाच्या जगात असेही काही होते. बिचारी लीना चंदावरकर, तिच्या या दोन्ही चित्रपटांना रसिकांनी नाकारले. लीनाने लहरी वा सनकी म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजकुमारसोबतच्या ’दिल का राजा’ (1972) मध्ये स्वीमिंग पूलात बेदिंग सूटात घडवलेले दर्शन चित्रपटाला वाचवू शकले नाही. या दृश्याची चर्चा फार झाली हो. गॉसिप्स मॅगझिन मुरत असल्याचा तो काळ होता. त्यांना असंच काही कलरफुल हवे असे. लीना चंदावरकरला अतिशय मोठी आणि महत्त्वाची संधी मिळाली ती असित सेन दिग्दर्शित ’बैराग’ (1976)मध्ये दिलीपकुमारची नायिका म्हणून! दिलीपकुमारची नायिका बनण्याचे नेहमीच अनेक अभिनेत्रींचे स्वप्न बघत. लीना चंदावरकरनेही ते पाहिले होते. दोघांच्या वयात चक्क 21 वर्षांचे अंतर आणि त्यातच चित्रपट रिशूटींगने थट्टेचा विषय झालेला. त्यावरून किती किस्से नि गोष्टी. पिता आणि दोन मुले अशा तिहेरी भूमिकेतील दिलीपकुमारची एक नायिका सायरा बानू होती. शहरी दिलीपकुमारची मॉडर्न नायिका लीना चंदावरकरने अतिशय उत्फूर्तपणे खुशीत साकारलीय हे ’सारे शहर मे आपसा कोई नहीं…’ गाण्यात प्रकर्षाने दिसतेय. जणू तिचं मोठेच स्वप्न पूर्ण झाले. तरीदेखील दिलीपकुमार आणि लीना चंदावरकर यांचे वयातील अंतर पडद्यावर दिसले. कॅमेरा ते लपवू शकला नाही. अरेरे, लीनाला संधी तर झक्कास लाभली होती, पण चित्रपट फ्लॉप झाला. पडेल पिक्चर्सचा कधीही कुठेही कसाही विषय निघू देत त्यात ‘बैराग’ असतोच. लीना चंदावरकरला प्रेम प्रकाश दिग्दर्शित ’चोर चोर’ (1974) या चित्रपटात विजय आनंदची प्रेयसी नाकारायची छान संधी मिळाली, पण या चित्रपटाच्या शूटिंग शेड्युलमध्ये नेमका चित्रपट संगीत वादकांचा संप झाल्याने या रहस्यरंजक चित्रपटात एकही गाणे समाविष्ट करता आले नाही. त्या काळात सस्पेन्स चित्रपटात गाणी मस्ट आणि मस्त असत. यू ट्यूबवर पिक्चर बघा. गाण्याना स्कोप होता हो. विजय आनंद हीरो असला तरी गाण्यांच्या टेकिंगवरही लक्ष देई. ती त्याची दिग्दर्शनीय खासियत. लीना चंदावरकरला नक्कीच फळली असती. या रूपेरी प्रवासात संजीवकुमार लीना चंदावरकरकडे विशेष आकर्षित झाल्याचे गॉसिप्स खूप रंगले. आजही त्या ’स्टोरीज’ रंगवून खुलवून सांगितल्या जातात. त्यांच्या रूपेरी परफॉर्म्समध्येही तो प्रेमरंग जाणवतो. पण हे नाते पुढे सरकले नाही. ’डाकू और जवान’ (1978), ’जालिम’ (1980) आफत (1980) या चित्रपटांनंतर लीना चंदावरकरचे करिअर तसे उताराला लागले. दरम्यान, अभिनेत्री म्हणून करिअर छान सुरू असतानाच लीनाने गोव्याच्या राजकीय घराण्यातील सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी अतिशय थाटात विवाह झाला. (8 डिसेंबर 1975 रोजी झालेला हा विवाह मराठी वृत्तपत्रातील पहिल्या पानाची फोटोसह बातमी होती.) दुर्दैवाने फार काळ टिकला नाही. एकदा रात्री एका समारंभावरून हे पती-पत्नी घरी परतताच पिस्तुलातून चुकून निघालेली गोळी सिद्धार्थ बांदोडकर यांच्या शरीरात घुसली आणि मग एक वेदनादायक प्रवास सुरू झाला. त्या वेळी सिध्दार्थ बांदोडकर यांच्यावरील उपचारासाठीचे औषध इंग्लंडवरून आणावे लागे. धर्मेंद्रने त्या वेळी लीना चंदावरकरला बरीच मदत केली. काही महिन्यांनी पुन्हा त्या औषधाची गरज भासताच पुन्हा धर्मेंद्रने आपल्या ओळखीतून ते मागवले. या औषधांची किंमत 20 हजार रुपये होते. (पन्नास वर्षांपूर्वी ही खूपच मोठी रक्कम होती.) लीना चंदावरकरच्या भावाने धर्मेंद्रला ते पैसे देण्याचा केलेला प्रयत्न धर्मेंद्रला अजिबात आवडला नसल्याचे त्या काळातील मीडियात चर्चेत होते. दुर्दैवाने काही महिन्यांनी सिद्धार्थ बांदोडकर यांचा आजार बळावला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण खूपच गाजले. या अनपेक्षित धक्क्यातून सावरत काही वर्षांनी लीना चंदावरकरने पुन्हा चित्रपटसृष्टीत परतायचे ठरवले. या वेळी ’प्यार अजनबी है’ (1980) या चित्रपटात भूमिका साकारताना या चित्रपटाचा लेखक, नायक, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार असा सबकुछ किशोरकुमार आणि लीना चंदावरकर यांच्यात निर्माण झालेल्या छान संबंधातून त्यांचा विवाह झाला. खरंतर हा चित्रपट ती स्वीकारण्यास तयार नव्हती, पण कामात मन लागेल असेही वाटले. तिने चित्रपट स्वीकारल्यावर एकदा किशोरकुमारने जुहू येथील आपल्या गौरी कुंज बंगल्यावर लीनाला जेवायला बोलावले. आणि गप्पांच्या ओघात त्याने लीनाला लग्नाची मागणी घातली. (तो बघ असंच काही करेल असे संजीवकुमारने सांगून लीना चंदावरकरला सावध केले होते हा किस्सा त्या काळात फारच गाजला.) सुरुवातीची थट्टा मस्करी मग खरी ठरली आणि त्यांनी लग्न केल्याची ब्रेकिंग न्यूज आली. (किशोरकुमारचा हा चौथा विवाह) काही वर्षांत लीनाने सुमीतला जन्म दिला. किशोरकुमारमध्ये ’बचपना फार होता’. म्हणून संसारात थोड्याफार कुरबुरी होत नि खेळकरपणे मिटत. किशोरकुमारचे एक तत्व होते, जो लोगों का हंसाते है वो दुनिया के लिए भगवान के बाद होता है असे लीना चंदावरकरने एका मुलाखतीत म्हटलयं. लीना चंदावरकरने कालांतराने चरित्र भूमिका साकारण्यास सुरुवात केली आणि त्यात एक चित्रपट होता, ’सरफरोश’ (1984). त्यात तिचा एकेकाळचा हीरो जितेंद्र व श्रीदेवी नायक व नायिका. याचं शूटिंग चेन्नईत, पण किशोरकुमारची इच्छा होती की लीनाने आता जितेंद्रसोबत काम करू नये. म्हणून तो अधूनमधून चेन्नईत फोन करे हाही किस्सा गाजला. किशोरकुमार व लीना चंदावरकर यांनी या काळात ’ममता की छाव मे’ या चित्रपटात एकत्र काम केले.
दुर्दैवाने 13 ऑक्टोबर 1987 रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने किशोरकुमारचे निधन झाले (मला आठवतंय संध्याकाळच्या वेळेस वृत्तसंस्थांनी टेलीप्रिन्टरवर ही बातमी देताच क्षणभर काय बोलावे तेच सुचेना… माझ्यासारख्या किशोरकुमार भक्तांना हा मोठाच दु:खद धक्का होता). वयाच्या अवघ्या सदतीसाव्या वर्षापासून लीना चंदावरकरला या धक्क्यातून सावरत वाटचाल करावी लागली. हा तिला दुसरा मोठा धक्का होता. कालांतराने तिने सोनी वाहिनीवर तिने ’के फॉर किशोर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला. काही वर्षांपूर्वी एका मराठी वृत्तपत्राच्या रविवार पुरवणीसाठी किशोरकुमारच्या जुहू येथील गिरी कुंजबंगल्यात लीना चंदावरकरच्या किशोरकुमारविषयी मुलाखतीचा योग आला असता तिने मराठीत बोलणे पसंत केले आणि एक चांगली आठवण सांगितली, लग्नापूर्वी किशोरदा अनेकदा तरी ‘ममता की छाव मे’च्या सेटवर सहजच गुणगुणत, मेरे दीवानेपन की दवा नही… या गाण्याचा अर्थ लीना चंदावरकरला काही काळाने लागला. आपण लीनाकडे आकर्षित झालोय हेच त्याला त्यातून सुचवायचे होते आणि ते साध्यही झाले… काही संगीतमय रियॅलिटी शोमध्ये लीनाचा सहभाग तिला जुन्या आठवणीत नेणारा असतो आणि त्यातून बरीच माहिती मिळते. ’मनचली’ चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण होत असतानाच हा सगळा पट तितकाच रंजक व महत्त्वाचा.

  • दिलीप ठाकूर- चित्रपट समीक्षक

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply