पनवेल : बातमीदार : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व शांतिनिकेतन तंत्रनिकेतन नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने इ. दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तंत्र शिक्षणामधील विविध शाखांतील करियरच्या उपलब्ध संधी आणि तंत्र शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची प्रक्रिया या विषयासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी करियरच्या वाटा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजिनीयरिंगचे प्राध्यापक डॉ. अविनाश सरोदे, प्रमुख वक्ते रविकांत चव्हाण, ज्योती माने, प्राध्यापिका शासकीय तंत्रनिकेतन, पेण यांचे मार्गदर्शन मिळाले. या वेळी नवी मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयातील दहावी व बारावीचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमास शांतिनिकेतन पब्लिक स्कूल नवीन पनवेलचे मुख्याध्यापक सचिन आवले, अनुराज लेकुरवाळे, रूपाली तराणेकर, तसेच विविध शाखांचे विभागप्रमुख अमोल देशमुख, स्मिता बारी, सुप्रिया म्हात्रे उपस्थित होते. हा कार्यक्रम शांतिनिकेतन तंत्र निकेतनचे प्राचार्य नानासाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.